नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, शहरवासीय घामाच्या धारांनी चिंब

नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, शहरवासीय घामाच्या धारांनी चिंब

नाशिक :  नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, मंगळवारी (दि.९) पारा ३८.८ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे उकाड्यात वाढ होऊन शहरवासीय घामाघूम झाले.

गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाच्या संकटानंतर नाशिकच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शहराच्या तापमानाचा पारा थेट ३९ अंश सेल्सिअसच्या जवळपास जाऊन ठेपल्याने तीव्र उकाडा जाणवतो आहे. दुपारी १२ ते ४ यावेळेत उष्णतेच्या लहरींचा वेग अधिक असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. परिणामी रस्त्यांवर अघोषित लॉकडाऊनसारखे चित्र पाहायला मिळते आहे. उष्णतेमुळे घर व कार्यालयांमध्ये बसणे मुश्कील झाले आहे. उकाड्यातून सुटका करून घेण्यासाठी सतत एसी, पंखे व कुलर सुरू ठेवले जात आहेत. मात्र, त्यातूनही उष्ण लहरी येत असल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

उन्हापासून बचावासाठी नागरिकांची पावले शीतपेयांचे दुकाने व आईस्क्रीम पार्लरकडे वळत आहेत. ग्रामीण भागातही उष्णतेची लहर कायम आहे. उन्हाच्या झळांमुळे दुपारनंतर शेतीची कामे थंडावली आहेत. तसेच ग्रामीण जनजीवनावरही त्याचा परिणाम होतो आहे. दरम्यान, उत्तर-मध्य भारतामधील मैदानी प्रदेशात हवेतील आर्द्रता नाहीशी झाल्याने सरासरी तापमानात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत आहे. त्यामुळे येत्याकाळात उष्णतेची लाट कायम राहिल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news