सचिन वाझेचा तळोजातील मुक्काम वाढला | पुढारी

सचिन वाझेचा तळोजातील मुक्काम वाढला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  १०० कोटींची खंडणी वसुली, मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलीया स्फोटके प्रकरणी कोठडीत असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा तुरुंगाबाहेर पडण्याचा मार्ग खडतर झाला आहे. सीबीआय न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर वाझेने अँटिलीया स्फोटके प्रकरणात जामीन अर्ज केला. मात्र त्यावर उत्तर सादर करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी पुन्हा वेळ मागितला. त्यामुळे जामिनाची सुनावणी १ जूनपर्यंत लांबणीवर पडली.

१०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाझेने आता अँटिलिया स्फोटके- मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्याच्या अर्जावर एनआयएला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

सुरुवातीला २६ एप्रिलपर्यंत, नंतर ९ मेपर्यंतची मुदत देण्यात आली. मंगळवारी विशेष एनआयए न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यासमोर वाझेच्या जामीनाची सुनावणी झाली. यावेळी एनआयएने उत्तर सादर करण्यास असमर्थता दर्शवत न्यायालयाकडे आणखी वेळ मागितली. तपास यंत्रणेची विनंती मान्य करीत न्यायालयाने एनआयएला १ जून पर्यंतची मुदत दिली.

Back to top button