नीटच्या परीक्षेत विद्यार्थिनींच्या ब्रा स्ट्रॅप तपासल्याने खळबळ; महाराष्ट्र, पश्चिम बंगालमधील धक्कादायक प्रकार | पुढारी

नीटच्या परीक्षेत विद्यार्थिनींच्या ब्रा स्ट्रॅप तपासल्याने खळबळ; महाराष्ट्र, पश्चिम बंगालमधील धक्कादायक प्रकार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्टच्या (नीट) परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना काही विशिष्ट प्रकारचे कपडे काढण्यास सांगण्यात आले, काहींना कपडे उलटे घालण्यास सांगण्यात आले तर काहींना पालकांचे कपडे घालावे लागले अशा धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या घटना घडल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर या घटना शेअर केल्या असून काही पालकांनी संबंधित आहेत. विभागाला यासंदर्भात तक्रार दिली आहे.

नीटने सुमारे ४ हजार सेंटरवर सुमारे २० लाख विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली. या परिक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) विशिष्ट ड्रेस कोड अनिवार्य केला आहे. या ड्रेस कोडला अनुसरुन कपडे न घालणाच्या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावरील विशिष्ट खोल्यांमध्ये कपडे बदलण्यास सांगण्यात आले. कपड्यांवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्राच्या परिसरात असलेल्या दुकानांमधून नवीन कपडे खरेदी करुन घातले तर काहींनी आपले कपडे पालकांना देऊन त्यांचे कपडे घातल्याचे प्रकारही समोर आले आहे.
याबाबत काही विद्यार्थ्यांनी एनटीएकडे तक्रारी दिल्या आहेत. काही मुलींच्या ब्रा स्ट्रॅप तपासण्यात आल्या तर काहींना अंतर्वस्त्रांच्या बटणा उघडण्यास सांगण्यात आले. विद्यार्थीनींची तपासणी करताना कर्मचाऱ्यांना संवेदनशील राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती परिक्षेपूर्वी एनटीएने दिली होती. तरीही या घटना घडल्या आहेत.

सांगलीतील एका डॉक्टर दांपत्याने सांगितले, की विद्यार्थिनीना कुर्ते काढून उलटे करुन घालण्यास सांगण्यात आले. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांना ही माहिती दिली. हा प्रकार चुकीचा असून नीटसारख्या महत्त्वपूर्ण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनीना अशी वागणूक दिली जाते हे योग्य नाही. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला आहे.

याबाबत पालकांच्या प्रतिनिधी सुधा शेनॉय यांनी सांगितले, की या परिक्षांसाठी प्राथमिक शिक्षकांना पर्यवेक्षक बनवले आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यांना याबाबत मार्गदर्शक तत्त्वे देण्यात यावी. काही परिक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांनी अॅडमिट कार्डवर सह्याही केल्या नाहीत. काही जणांच्या अॅडमिट कार्डचे पान एक घेतले तर काहींचे पान दोन. यावरुन या केंद्रांवर प्रचंड गोंधळाचे वातावरण होते हे दिसून येते.

Back to top button