

राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : मागासवर्गीय कुटुंबाची शेतजमीन हडप करण्याच्या दृष्टीने धन दांडग्यांकडून शिवरस्ता बंद करण्यात आला, असा गंभीर आरोप करीत राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द व चंडकापूर शिवरस्ता खुला करून मिळण्यासाठी आज (मंगळवारी) तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. शेवबाई विठ्ठल दोंदे यांची केंदळ खुर्द येथे शेतजमीन आहे. शेतात जाण्यासाठी शिवरस्ता आहे. तो केंदळ खुर्द व चंडकापूर या दोन गावांचा आहे. या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे सध्या तो बंद आहे. शिवरस्ता खुला करण्यासाठी पीडित कुटुंबांनी अनेक वेळा तक्रार अर्ज केले.
मंडल अधिकारी यांनी या ठिकाणी पाहणी केली, मात्र तो शिवरस्ता खुला करण्या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही. शेवबाई दोंदे या धरणग्रस्त आहेत. आजूबाजूला असलेले काही शेतकरी मागासवर्गीय कुटुंबाच्या जमिनी हडपण्यासाठी, 'ती शेत जमीन विकून टाका. आम्ही आठ दिवसांमध्ये शिवरस्ता खुला करू. आम्ही सवर्ण समाजातील असून तुम्हीच फक्त मागासवर्गीय आहात. शेतजमीन आम्हाला विका. तुम्ही जमीन विकली नाही तर आम्ही कधीही शिवरस्ता खुला करून देणार नाही. शासनाचे अधिकारी बळावर विकत घेऊ,' असे काही मंडळी बोलत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे दोंदे कुटुंबियांचे जगणे कठीण झाले आहे, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मागासवर्गीय कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाबाबत अद्यापपर्यंत प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे दोंदे कुटुंबियांवर अखेर उपोषण करण्याची वेळ आली आहे. उपोषणाला राजू आढाव, यमुना भालेराव, शिवाजी शेजूळ, राजेंद्र आढाव, अनिल आढाव, गुलाब आढाव, मच्छिंद्र आढाव, प्रकाश आढाव, उद्धव आढाव, रवींद्र आढाव, बाळासाहेब आढाव, आदिनाथ आढाव आदींनी पाठिंबा दिला आहे. शिवरस्ता तत्काळ खुळा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राजू आढाव यांनी दिला आहे.