Sachin Tendulkar Records : सचिनचे ‘ते’ ७ विक्रम मोडणे अशक्यच! कोहली त्यापासून आहे खूप दूर

Sachin Tendulkar Records : सचिनचे ‘ते’ ७ विक्रम मोडणे अशक्यच! कोहली त्यापासून आहे खूप दूर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तब्बल दोन दशके क्रिकेटच्या मैदानावर राज्य करणाऱ्या सचिनने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले, जे मोडणे फार कठीण आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या द्विशतकाची बरोबरी करण्याचा विचार एकेकाळी कोणत्याही खेळाडूने केला नव्हता पण आता अनेक फलंदाजांनी वनडेत द्विशतके झळकावली आहेत. क्रिकेटच्या बदलत्या काळातही सचिनचे असे काही विक्रम आहेत जे मोडणे अशक्य आहे. अशी काही रेकॉर्ड जाणून घेवूया. (Sachin Tendulkar Records)

एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा

एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. २००३ च्या विश्वचषकात सचिनने ६७३ धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. मॅथ्यू हेडनने ६५९ तर रोहित शर्माने ६४९ धावा केल्या आहेत, परंतु सचिनचा विक्रम कोणीही मोडू शकले नाही. आगामी काळातही त्याचा विक्रम मोडणे कठीण आहे.

सचिनच्या नावावर १०० शतकांचा विक्रम

सचिन तेंडुलकरने कसोटी सामने आणि एकदिवसीय सामन्यांसह एकूण ६६३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ५१ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १०० शतके झळकावली आहेत. या विक्रमात विराट कोहली त्याच्या सर्वात जवळ आहे, पण कोहलीला १०० शतके झळकावणं कठीण आहे.

कसोटीत सर्वाधिक चौकार

सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने कसोटीत २,०५८ हून अधिक चौकार मारले आहेत. राहुल द्रविड १ हजार ६५४ चौकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. सध्याच्या खेळाडूंमध्ये रुट १ हजार २०४ चौकारांसह आघाडीवर आहे.

सर्वाधिक कसोटी सामने

सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०० कसोटी सामने खेळले आहेत. तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू आहे. या बाबतीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन १७९ सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर असला तरी ४० वर्षीय अँडरसनसाठी आणखी २१ कसोटी सामने खेळणे सोपे नाही.

सर्वात प्रदीर्घ एकदिवसीय कारकीर्द

सचिन २२ वर्ष ९१ दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळला. हा देखील एक विक्रमच आहे. सचिन शिवाय इतर कोणत्याही खेळाडूची एवढी प्रदीर्घ कारकीर्द झालेली नाही. क्रिकेटच्या बदलत्या युगात खेळाडूंवर कामाचा ताण वाढत असून फिटनेस हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सचिनचा हा विक्रम मोडणे अशक्य आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५१ शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसचा क्रमांक लागतो. त्याने ४५ शतके झळकावली आहेत. सध्या स्टीव्ह स्मिथ ३० शतकांसह आघाडीवर आहे. रूटच्या नावावर २९ आणि विल्यमसन व कोहलीची २८ शतके आहेत.

सर्वाधिक धावा

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. त्याचा हा विक्रम कोणी मोडलेला नाही. २८ हजार १६ धावा करणाऱ्या कुमार संगकाराचे नाव सचिननंतर येते. सध्या विराट कोहली २५ हजार ३२२ धावांसह फलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. कोहलीला आगामी काळात १० हजार आंतरराष्ट्रीय धावा कराव्या लागणार आहेत. (Sachin Tendulkar Records)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news