MS Dhoni : धोनीच्या नेतृत्वावर जुही चावला फिदा; म्हणाली, “धोनीला कर्णधार म्हणून पाहणे अद्भूत” | पुढारी

MS Dhoni : धोनीच्या नेतृत्वावर जुही चावला फिदा; म्हणाली, "धोनीला कर्णधार म्हणून पाहणे अद्भूत"

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हे त्याच्या चाहत्यांसाठी केवळ एक नाव नाही तर एक भावना देखील आहे. चेन्नई आणि कोलकाता यांच्यात इडन गार्डन्सवर काल झालेल्या सामन्यात पुन्हा प्रेक्षकांनी “धोनी- धोनी” असा जयघोष केला. धोनीच्या नेतृत्वावर संपुर्ण क्रिकेटविश्व फिदा आहेच आता केकेआरची सह-मालकीन जुही चावला देखील त्याच्या नेतृत्वावर फिदा झाली. प्रेक्षकांचा धोनीवरील प्रेमाचा वर्षाव पाहून “एमएस धोनीला कर्णधार म्हणून खेळताना पाहणे अद्भूत आहे” असे तिने म्हटले आहे.

कोलकातामधील ईडन गार्डनवरील प्रेक्षकांच्या साक्षीने चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात केली. सीएसकेने प्रथम 235 धावा केल्या, त्यानंतर केकेआरला 186 धावांत रोखले. या सामन्यात पाच अर्धशतके झाली. चेन्नईकडून रहाणे, कॉन्वे, दुबे यांनी तर केकेआरकडून जेसन राय आणि रिंकू सिंग यांनी पन्नाशी गाठली. हा सामना पाहण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सची सह-मालकीन आणि अभिनेत्री जुही चावला उपस्थित होती. सामन्यातील केकेआरच्या पराभवानंतर जूही चावलाने धोनीचे कौतुक केले. ती म्हणाली, “चेन्नई सुपर किंग्जने आज चांगला खेळ केला. एमएस धोनीला कर्णधार म्हणून खेळताना पाहणे आश्चर्यकारक आहे. आम्हाला आशा आहे की आमच्या पुढच्या सामन्यात सीएसकेने जे केले ते आम्ही करू शकू. सामन्यावेळी सीएसकेचे समर्थन करणारे बरेच लोक होते, त्यामुळे आम्हाला वाटले की आम्ही चेन्नईला पोहोचलो आहोत.”

केकेआरला हरवून सीएसके ‘टॉप’वर

सीएसके रविवारी केकेआर विरूद्धचा सामना जिंकून गुणतक्त्यात टॉपवर गेली आहे. चेन्नईने उभ्या केलेल्या 235 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या आठ चेंडूंत त्यांचे दोन्ही सलामीवीर सुनील नारायण (0) आणि एन. जगदिशन (1) तंबूत परतून फॅनची थंड हवा खात होते. या संकटातून संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांच्यावर होती; परंतु आधी अय्यर (20) आणि नंतर राणा (27) यांनी जबाबदारी झटकली. यानंतर जेसन राय आणि रिंकू सिंग यांची जोडी जमली. विशेषत: जेसन रायने आक्रमक फलंदाजी केली. त्याने 19 चेंडूंत अर्धशतक गाठताना धावफलक हलता राहील याची दक्षता घेतली. धोनीची ही डोकेदुखी महेश तिक्ष्णाने घालवली. 26 चेंडूंत 61 धावा करणार्‍या रायचा तिक्ष्णाने त्रिफळा उडवला. त्याच्या जागी आलेल्या रसेलची मसल पॉवर दिसलीच नाही, तो 9 धावांवर बाद झाला. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना रिंकू सिंग मात्र नेटाने दुसरी बाजू लढवत होता, पण टार्गेट मोठे असल्याने त्याच्याही आवाक्याबाहेर गेले. तो 53 धावांवर नाबाद राहिला. केकेआरच्या 8 बाद 186 धावा झाल्या.

तत्पूर्वी, केकेआरने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजीला पाचारण केले, पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. अजिंक्य रहाणेचा 29 चेंडूंत नाबाद 71 धावांचा झंझावात आणि डेव्हॉन कॉन्वे (40 चेंडूंत 56), शिवम दुबे (21 चेंडूंत 50) यांच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल साखळी सामन्यात केकेआरविरुद्ध निर्धारित 20 षटकांत 4 बाद 235 धावांचा डोंगर रचला. रहाणेने 6 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली, तर डेव्हॉन कॉन्वेने 4 चौकार, 3 षटकारांसह 56 तर शिवम दुबेने 2 चौकार, 5 षटकारांसह 50 धावा फटकावल्या.

हेही वाचा : 

 

 

Back to top button