Happy Birthday Sachin Tendulkar : क्रिकेटच्या महामेरूची सुवर्णझेप

Happy Birthday Sachin Tendulkar : क्रिकेटच्या महामेरूची सुवर्णझेप

– निमिष पाटगावकर

या जगात कर्तृत्ववान माणसांची संख्या कमी नाही, पण या कर्तृत्ववान माणसात एखाद्याचे मोठेपण जास्त जाणवते. ते जरी त्याच्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घातली तरी त्याच्या पायांनी जमिनीशी नाते तोडलेले नसते तेव्हा. कर्तृत्वाच्या जोरावर समाजात मानसन्मान, पैसा सगळे काही मिळेल, पण या सर्वांकडे तटस्थपणे बघायला उपयोगी पडतात ते संस्कार. सचिन तेंडुलकरला तुम्ही जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा सर्वात प्रथम काय जाणवत असेल ते म्हणजे त्याच्यावरचे संस्कार. भारतरत्न, दोन दशके प्रतिस्पर्धी देशांच्या अनेक क्रिकेटपटूंच्या पिढ्या खेळत घडलेला सार्वकालीन महान क्रिकेटपटू वगैरे काही काही न जाणवता तुम्हाला कायम दिसतो तो एका मध्यमवर्गीय साहित्यिकाच्या घरातून आलेला एक सुसंस्कृत माणूस.

सचिनच्या कारकिर्दीचा विचार करताना आपल्याला क्रिकेटमध्ये झालेल्या बदलांचा विचारही केला पाहिजे. एक म्हणजे वेळोवेळी होणारे नियमातले बदल आणि दुसरे म्हणजे क्रिकेटमध्ये शिरलेल्या तंत्रज्ञानातले बदल. सचिनने जेव्हा पदार्पण केले तेव्हा आजच्यासारखे व्हिडीओ अनॅलिस्ट, विविध अ‍ॅनालिटिक्स सॉफ्टवेअर्स वापरून केलेला आपल्या आणि प्रतिस्पर्धी तंत्राचा अभ्यास हे काही नव्हते. तेव्हा होते ते तुमचे घोटवलेले तंत्र आणि समोर आग ओकणारे आक्रम, वकार आणि इम्रान. तिथपासून ते आजच्या अद्ययावत सॉफ्टवेअर्सच्या माहितीचा आधार घेऊन, आपल्या शारीरिक बदलांचा परिणाम लक्षात घेत तंत्रात करावे लागणारे बदल हे सर्व सचिनने सहजतेने केले आणि म्हणूनच तो काळाबरोबरच न राहता काळाच्या पुढचा विचार करणारा महान क्रिकेटपटू झाला. श्रीकांतच्या नेतृत्वाखाली जेव्हा कराचीला सचिनने पदार्पण केले तेव्हा सचिनच्या कारकिर्दीतल्या शेवटच्या कसोटीतील साथीदारांपैकी विराट कोहलीने नुकताच आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता आणि बाकी बहुतेक बडबडगीते म्हणण्यापर्यंत आले होते. 1988 मध्ये तर सचिनच्या त्या शेवटच्या कसोटीतील आपली जलदगती गोलंदाजांची जोडी भुवनेश्वर कुमार आणि शमी अजून जन्मायची होती.

एकेकाळी सचिन बाद झाला की घरातला कर्ता पुरुष गमावल्यासारखी पोकळी जाणवायची. प्रतिस्पर्ध्याला सचिन तेंडुलकरची विकेट किती महत्त्वाची वाटायची याचा एक किस्सा सांगतो. त्या प्रसिद्ध 2002 च्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी मी लॉर्डस्ला चाललो होतो. लंडनच्या ट्यूबमधून सेंट जॉन्स वूड स्टेशनकडे जाताना गाडी इंग्लिश आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांनी भरली होती. अनेक पावसाळे बघितलेल्या एका बुजुर्ग इंग्लिश प्रेक्षकांशी मी सामन्याच्या अंदाजाबद्दल गप्पा मारायला सुरुवात केली. तेव्हा त्याने एकच सांगितले, 'आम्ही तेंडुलकरला चाळीसच्या आत बाद करू शकलो तर आम्हाला संधी आहे.' भले तो सामना कैफ-युवराजने जिंकून दिला, पण संघात गांगुली, सेहवाग, द्रविड सारखे महारथी असतानाही इंग्लंडला भीती कुणाची होती हे तो सामान्य प्रेक्षक सांगून गेला. सचिन तेंडुलकरच्या या यशात आणि साधेपणात बंधू अजित तेंडुलकरांचे खूप योगदान आहे हे सचिननेच अनेकदा सांगितले आहे. ज्ञानदेवांना जसे निवृत्तीनाथांचे लाभले तसे एखाद्या तपस्वीसारखे हे गुरुबंधूंचे मार्गदर्शन मिळायलाही भाग्यच लागते. मुंबईच्या 'खडूस' वृत्तीला जागून सचिन आज सुवर्णमहोत्सवी वाढदिवशी पुन्हा नव्याने गार्ड घेईल आणि पुढची इनिंग सुरू करेल. त्याच्या शतकी वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news