Pune Ganeshotsav : गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी गुरुजींच्या जागी आता अॅप
पुणे : 'विलेपनार्थे चंदनं समर्पयामी…, हरिद्रा कुंकुमं समर्पयामी…, नैवेद्यं समर्पयामी…, अनेन कृत पूजनेनं श्रीमहागणपति: प्रीयताम…' गणरायाच्या प्रतिष्ठापनेवेळी गुरुजींच्या तोंडून पडणारे हे श्लोक. पूजेसाठी गुरुजी आणि त्यांच्या मंत्रोच्चाराशिवाय कोणताही धार्मिक विधी हा अपूर्णच. मात्र, मागील काही वर्षांत गुरुजींकडील पूजा आणि अन्य कार्यभार पाहता त्यांची संख्या अपुरी पडू लागली. त्यामुळे गणेशभक्तांकडून विविध कंपन्यांनी तयार केलेली अॅप तसेच यूट्युबवर विविध लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत.
संबंधित बातम्या :
प्रतिष्ठापनेवेळी प्रत्यक्षात गुरुजी नसले तरी त्याच भक्तिभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करता येणे गणेशभक्तांना शक्य झाले आहे.
विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाल्यानंतर श्री सिध्दीविनायक महागणपतीचे पूजन शुभमुहूर्तावर करणे गरजेचे ठरते. घरोघरी तसेच सार्वजनिक स्वरूपात प्रतिष्ठापना होणार्या गणपतींची संख्या पाहता सर्वांकडे गुरुजींना शक्य नसल्याने विविध कंपन्यांनी खास गणेशोत्सवासाठी विविध अॅप उपलब्ध केली आहेत. यामध्ये, प्राणप्रतिष्ठा, आरतीसंग्रह, उत्तरपूजेचा समावेश असतोे. पूर्वी पुस्तक वाचून प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत होती. मात्र, संस्कृतमधील मंत्रोच्चार करणे हे प्रत्येकासाठी सहजशक्य नव्हते. आता अॅपद्वारे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
सार्वजनिक गणेशमंडळांनी यूट्युबवरही प्रत्यक्षात होत असलेल्या पूजेच्या चित्रफिती विविध लिंकद्वारे प्रसारित केल्या आहेत. सिध्दीविनायक श्री महागणपतीच्या पूजेसाठी अॅप तसेच लिंकच्या रूपातून प्रत्यक्षात गुरुजी उपलब्ध होत असल्याने गणपतीच्या आगमनापूर्वी हे अॅप डाऊनलोड करण्याकडे भक्तांचा कल आहे.
अॅपमध्ये संपूर्ण विधी
प्राणप्रतिष्ठापनेवेळी लागणार्या तसेच बाहेरून आणाव्या लागणार्या साहित्याची यादी, पूजेसाठी घरात उपलब्ध वस्तू, पूजेपूर्वी काय तयारी करावी, त्यानंतर प्रत्यक्षात पूजा या गोष्टींचा समावेश केला आहे. याखेरीज, अॅपमध्ये आरतींचा संग्रह, प्रार्थना व मंत्रपुष्पांजली समाविष्ट करण्यात आहे. गणरायाच्या निरोपादिवशी करण्यात येणार्या उत्तरपूजेसाठीची सामग्री, प्रत्यक्षात पूजाही अॅपमधून सांगण्यात येत आहे.
शहरात मागणीच्या तुलनेत पुरोहितांची संख्या कमी आहे. त्यामुळे गणपतीच्या दिवशी अनेक लोकांना गुरुजी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गणपतीची पूजा कशी करावी, असा प्रश्न गणेशभक्तांसमोर उभा राहिला होता. त्यापार्श्वभूमीवर, मंडळाच्या वतीने प्रत्यक्षात होणार्या प्रतिष्ठापनेचे चित्रीकरण करून ते यूट्युबवर अपलोड केले. जेणेकरून गणेशभक्तांची गुरुजींशिवाय गैरसोय होणार नाही. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.
– अॅड. हेमंत झंजाड, ट्रस्टी, सेवा मित्रमंडळ
हेही वाचा