ठाणे : आठ महिन्याच्या बाळाचा मृतदेह घेऊन बाप रूग्‍णालयातून पसार | पुढारी

ठाणे : आठ महिन्याच्या बाळाचा मृतदेह घेऊन बाप रूग्‍णालयातून पसार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा शवविच्छेदन नको म्हणून आपल्या 8 महिन्याच्या मुलाचा मृतदेह घेऊन बाप पसार झाल्याची घटना पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली.

काल (गुरूवार) रात्री 11: 15 वाजण्याच्या दरम्यान 8 महिन्याच्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते .मात्र आज पहाटे उपचारादरम्यान या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले होते त्या वेळी निमोनियाचे देखील लक्षणे होती. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर मुलाच्या बापाने शवविच्छेदनाला विरोध केला आणि आपल्या बाळाचा मृतदेह घेऊन सरळ पसार झाला.

ही घटना घडल्या नंतर रुग्णालयात एकच गोंधळ झाला. याची माहिती रुग्णालयाकडून तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ डायघर येथून या इसमास पकडले असल्याचे समजते.

मात्र, अद्याप बाळाचा मृतदेह रूग्णालयात आणण्यात आलेला नाही. एका 8 महिन्याच्या बाळाला रुग्णालयातून घेऊन जात असताना रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था काय करत होती? असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एक महिन्यापूर्वी याच पालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले असताना आता या घटनेमुळे कळवा रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button