पुढारी ऑनलाईन: राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासात एकही नव्या कोरोना रूग्णाची नोंद झालेली नाही. मार्च २०२० ला कोरोनाची सुरूवात झाल्यापासून प्रथमच दिल्लीत कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा ०.०० टक्के पाहायला मिळाला आहे. जगातील विविध देशांमध्ये कोराना रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र असताना दिल्लीतील 'झिरो' कोव्हिडमुळे दिल्लीसह संपूर्ण देशाला दिलासादायक स्थिती पाहायला मिळाली आहे.
गेल्या 24 तासांत दिल्ली शहरात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला नाही. त्यामुळे सोमवारी दिल्लीत कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा ०.०० टक्के पाहायला मिळाला. कोविडविरूद्धच्या लढाईतील ही आकडेवारी अगदी दिलासादायक असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 10 झाली आहे, असेही दिल्ली आरोग्य विभागाने एका बुलेटिनमध्ये म्हटले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ७ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता.
दिल्लीत आतापर्यंत २,००७,३१३ लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली. २६,५२२ जणांना या महामारीत आपला जीव गमवावा लागला आहे. आत्तापर्यंत भारतातील दिल्लीसह अनेक शहरांनी तीन कोविड लाटेंचा सामना केला आहे. यामधील एप्रिल-मे २०२१ दरम्यान भारतात आलेली कोविड डेल्टाची लाट ही सर्वात प्राणघातक होती.