पुढारी ऑनलाईन डेस्क : Corona Death in China : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना व्हायरससाठी चीनला जबाबदार धरले जात आहे. दरम्यान, चीननेच कबूल केले आहे की, गेल्या महिन्याभरात कोविडची लागण झालेल्या सुमारे 60 हजार लोकांचा देशातील रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला आहे, जो आधी नमूद केलेल्या चीनमधील कोरोना मृत्यूच्या आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहे. रूग्णालयातील रूग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीमध्ये घरांमध्ये झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीचा समावेश नाही.
कोविड झिरो पॉलिसी संपल्यानंतर चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा झपाट्याने फैलाव होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. झिरो कोविड पॉलिसीमध्ये चाचण्या, प्रवास मार्गदर्शक तत्त्वे, लॉकडाऊन यासह अनेक नियम समाविष्ट होते, मात्र, चीनने ते मागे घेतले. यानंतर चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे नियम हटवल्यापासून चीनमधील 1.4 अब्ज लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. (Corona Death in China)
दरम्यान, चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशन (NHA) अंतर्गत वैद्यकीय प्रशासन ब्युरोचे प्रमुख जिओ याहुई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चीनच्या रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 8 डिसेंबर ते 12 जानेवारीपर्यंत आतापर्यंत 59,938 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे मात्र, आता हे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. (Corona Death in China)
ते पुढे म्हणाले की, 59,938 मृत्यूंपैकी 5,503 मृत्यू कोरोना संसर्गामुळे श्वसनाच्या समस्येमुळे झाले आहेत, तर उर्वरित मृत्यू कोरोना आणि इतर आजारांमुळे झाले आहेत. त्याचवेळी, चीनमध्ये यावर्षी कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या 10 लाखांवर पोहोचण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मात्र, सुरुवातीला चीनने मृतांची संख्या लपवून ठेवली होती. त्यांनी जगाला कोरोनामुळे मृत्यूची संख्या केवळ पाच हजार सांगितली होती. (Corona Death in China)