पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दराने आज बुधवारी उच्चांक गाठला. आज शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६२,७७५ रुपयांवर पोहोचला. कालच्या तुलनेत आज सोने ८६२ रुपयांनी महागले. तर चांदीच्या दरात ८६१ रुपयांनी वाढ होऊन दर प्रति किलो ७५,७५० रुपयांवर गेला. (Gold rate today)
दरम्यान, एमसीएक्सवर (MCX) सोने फेब्रुवारी फ्यूचर्स प्रति १० ग्रॅम ६२,९३४ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. कमकुवत झालेल्या डॉलर निर्देशांकामुळे बाजारात सोन्याला झळाळी मिळाली आहे. डॉलर निर्देशांक सध्या तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर व्यवहार करत आहे आणि तो १०३ अंकाच्या खाली आला.
संबंधित बातम्या
फेब्रुवारी गोल्ड कॉन्ट्रॅक्ट दुपारी १२ च्या सुमारास प्रति १० ग्रॅम ६२,८०० रुपयांवर होते. सर मार्च सिल्व्हर फ्यूचर्स प्रति किलो ७६,९९६ रुपयांवर होते. फ्यूचर मार्केटमध्ये सोने ६२,७२२ रुपयांवर बंद झाले होते. (MCX Gold futures)
इंडिया बुलिया अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ६२,७७५ रुपये, २३ कॅरेट सोने ६२,५२४ रुपये, २२ कॅरेट ५७,५०२ रुपये, १८ कॅरेट ४७,०८१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३६,७२३ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ७५,७५० रुपयांवर खुला झाला आहे. (Gold rate today)
सोन्याचा दर मागणी आणि पुरवठा यावर निश्चित केला जाते. सोन्याची मागणी वाढल्यास दरातही वाढ होते. सोन्याचा पुरवठा वाढल्यास दरात घट होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक स्थितीचा सोन्याच्या दरावर प्रभाव राहतो. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत नसेल गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.