Godrej Family Split | कुलूप ते रिअल इस्टेट…! १२७ वर्षांनंतर गोदरेज कुटुंबात वाटणी, नेमकं काय झालं?

Godrej Family Split | कुलूप ते रिअल इस्टेट…! १२७ वर्षांनंतर गोदरेज कुटुंबात वाटणी, नेमकं काय झालं?
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुलूप, साबण, फर्निचर आणि गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादनापासून ते रिअल इस्टेट क्षेत्रात दबदबा असणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक गोदरेज (Godrej) कुटुंबात १२७ वर्षानंतर वाटणी झाली आहे. गोदरेज समुहाचे २ भागात विभाजित करण्याचा करार या कुटुंबाने केला आहे. या करारानुसार आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर गोदरेज समूहाच्या ५ लिस्टेड (सूचीबद्ध) कंपन्यांचे मालक असतील. त्यांचा चुलत भाऊ जमशेद आणि स्मिता यांना अन- लिस्टेड कंपन्या आणि लँड बँक मिळणार आहे. त्यात मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. (Godrej Family Split)

गोदरेज समुहाने शनिवारी उशिरा याची माहिती शेअर बाजाराला दिली. मंगळवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या बैठकीनंतर गोदरेज कुटुंबाने समूहातील शेअरहोल्डिंगची पुनर्रचना जाहीर केली. दोन्ही समुह गोदरेज ब्रँडचा वापर कायम ठेवतील, असे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Godrej समूहाने जारी केलेल्या निवेदनानुसार, हा समुह एका बाजूला आदि गोदरेज (वय ८२) आणि त्यांचा भाऊ नादिर गोदरेज (वय ७३) आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज (वय ७५) आणि स्मिता गोदरेज कृष्णा (वय ७४) अशा दोन भागात विभागला गेला आहे.

अशी झाली भावांमध्ये वाटणी

गोदरेज एंटरप्रायझेस समुहात Godrej & Boyce आणि त्याच्या संलग्न कंपन्यांचा समावेश आहे. त्यांचा एरोस्पेस आणि विमान वाहतूक ते संरक्षण, फर्निचर आणि आयटी सॉफ्टवेअर अशा अनेक क्षेत्रात त्यांचा उद्योग पसरलेला आहे. यावर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून जमशेद गोदरेज यांचे नियंत्रित असेल. तर त्यांची बहीण स्मिता यांची मुलगी न्यारिका होळकर (४२) ह्या कार्यकारी संचालक असतील.

त्यांच्या कुटुंबीयांकडे मुंबईतील मोक्याच्या ३,४०० एकरसह लँड बँक असेल.

दरम्यान, गोदरेज इंडस्ट्रीज समुहात गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ॲग्रोव्हेट आणि एस्टेक लाईफसायन्सेस या ५ सूचीबद्ध कंपन्या आहेत. याचे नादिर गोदरेज अध्यक्ष असतील आणि यावर आदि, नादिर आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांचे नियंत्रण असेल.

आदि यांचा मुलगा पिरोजशा गोदरेज हे GIG चे कार्यकारी उपाध्यक्ष असतील आणि ऑगस्ट २०२६ मध्ये अध्यक्ष म्हणून नादिर यांची जागा घेतील, असे निवेदनात म्हटले आहे. (Godrej Family Split)

गोदरेजची स्थापना १८९७ मध्ये भारताला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. गोदरेजने १९५८ मध्ये फ्रिज बनवण्यास सुरुवात केली. गोदरेज हा भारतातील फ्रिज बनवणारी पहिली कंपनी आहे. १९७४ मध्ये गोदरेजने केसांना कलर करणारे डाय बाजारात आणले. १९९० दशकात गोदरेजने रियल इस्टेट क्षेत्रात पाऊल ठेवले. १९९१ मध्ये गोदरेजने कृषीशी संबंधित उद्योगाची सुरुवात केली.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news