Goa Election : पत्रादेवी तपासणी नाक्यावर ‘मतांसाठी’ निर्बंधात सूट?

Goa Election : पत्रादेवी तपासणी नाक्यावर ‘मतांसाठी’ निर्बंधात सूट?

बांदा : पुढारी वृत्तसेवा ः 14 फेब्रुवारी रोजी 40 जागांसाठी गोवा राज्याची विधानसभा निवडणूक पार पाडत असल्याने गोवा-महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवी (गोवा) तपासणी नाक्यावर कोरोना नियमांना काही प्रमाणात शिथलता दिसून येत आहे. गोव्यातील काही मतदार हे सिंधुदुर्गात वास्तव्यास असल्याने आपल्या पारड्यात मते पडण्यासाठी आणि मतदानाच्या टक्क्यावर परिणाम न होण्यासाठी ये-जा करणार्‍यांना निर्बंधातून काहीशी सुट मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सत्तेत असलेले गोव्यातील भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास सिंधुदुर्गाशी असेच नाते ठेवणार की पुन्हा निर्बंध कडक करणार? अशी चर्चा महाराष्ट्र राज्यातील नागरिकांमध्ये होत आहे.

महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी तपासणी नाक्यावर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गोव्यात जाणार्‍या वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. साहित्याने भरलेल्या बॅगा व गाड्या तपासल्या जातात. मात्र मतदार नाराज होऊ नये याकरिता गोव्यात प्रवेश करणार्‍यांना लसीकरण केलेले दोन्ही डोस पूर्ण असलेल्याना बिनदिक्कत प्रवेश दिला जात आहे. गोवा निवडणूक सर्वांनी प्रतिष्ठेची केल्याने मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून कडक निर्बंध घातले नाहीत. मते आपल्या पारड्यात पडावी म्हणून प्रत्येकाला निर्बंधात सूट दिली असल्याची चर्चा आहे. कोरोनाकाळात प्रत्येक ठिकाणी तपासणी केली जात होती परंतु सद्यस्थितीत यात शिथीलता आली आहे. (Goa Election)

जुना पत्रादेवी मार्गावरून विनातपासणी वाहतूक सुरू असल्याने ज्यांना हा मार्ग माहिती आहे अशा प्रवाशांना कोणतीही अडचण होत नाही. सरकार चालविणारे नेतेमंडळींचा लक्ष मतदानावर असल्याने नियमांना तिलांजली देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून मोठ्याप्रमाणात वाहतूक सुरू आहे. गोव्यात भाजपची सत्ता आहे. मागील दोन वर्षे कोरोनाच्या कालावधीत सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांना गोव्यात प्रवेश करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. परंतु मतदानासाठी सर्व काही माफ असेच दिसत आहे. मात्र, निकाल लागल्यानंतर ही परिस्थिती कायम राहणार का हे स्पष्ट होईल. (Goa Election)

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news