Goa Election : उमेदवारांचे शिक्षण माहित आहे का?, काहीजण पाचवी पास, तर नववीत शाळा सोडलेले १९ जण रिंगणात | पुढारी

Goa Election : उमेदवारांचे शिक्षण माहित आहे का?, काहीजण पाचवी पास, तर नववीत शाळा सोडलेले १९ जण रिंगणात

पणजी ; विलास ओहाळ : राज्यातील ४० जागांसाठी विविध पक्षांतर्फे आणि अपक्ष म्हणून एकूण ३०१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येत्या १४ तारखेला मतदान प्रक्रिया होणार आहे. परंतु एवढ्या सर्वांमध्ये निवडून देण्यात येणार्‍या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेवर नजर टाकल्यास २९ जण दहावी पासही झालेले नसल्याचे दिसून येते. तर एवढ्या सर्व उमेदवारांमध्ये एकमेव पीएचडीधारक उमेदवार असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय २५ ते ३० या वयोगटातील युवा उमेदवारांची संख्या केवळ १४ असल्याचे दिसून येते. (Goa Election)

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या खासगी संस्थेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या वैयक्तिक माहितीनुसार उमेदवारांची वरील शैक्षणिक अर्हता समोर आली आहे. विशेष म्हणजे दोन असे उमेदवार आहेत की, त्यात त्यांना फक्त लिहिता-वाचता येते. आपल्या शैक्षणिक पात्रतेत त्यांनी तशी माहिती दिली आहे.

त्याचबरोबर दहावीच्या इयत्ते खाली शिकलेल्यांची संख्या २९ आहे. त्यात वरील लिहिता-वाचता दोघांचाही समावेश करावा लागेल. पाचवी उत्तीर्ण झालेले आठ उमेदवार रिंगणात आहेत. त्याशिवाय आठवी पास होऊन नववीतून शाळा सोडलेले १९ उमेदवार आहेत. त्याशिवाय दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या अर्धशतकी (५०) आहे, हे विशेष.

Goa Election : बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार ६१

बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार ६१ आहेत ही सुद्धा एक चांगली बाब म्हणावी लागेल. पदवी घेतलेल्या उमेदवारांची संख्या ६७ आहे. व्यावसायिक पदवी शिक्षण घेतलेले ३३ उमेदवार आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांची संख्या २४, डॉक्टर केवळ १ आणि डिप्लोमाचे शिक्षण घेतलेल्यांची ३४ अशी संख्या असल्याचे दिसते.

उमेदवारांच्या शिक्षणाची स्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या वयोगटाचा विचार केल्यास ३०१ पैकी चौदा उमेदवारच २५ ते ३० वयोगटातील आहेत. तर ४१ ते ५० या वयोगटातील ११२ उमेदवार रिंगणात आहेत.

वयोगट उमेदवार संख्या

-२५-३० १४
-३१-४० ५१
-४१-५० ११२
– ५१-६० ८९
-६१-७० ३३
-७१-८० ०२
– एकूण ३०२

Back to top button