पेण; कमलेश ठाकूर : गणपतीचे माहेरघर असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातून गेल्या तीन महिन्यांपासून गणेशमूर्ती महाराष्ट्रासह इतर राज्ये व परदेशात रवाना होत आहेत. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक मूर्ती विदेशात रवाना झाल्या आहेत. यावर्षी प्रथमच सात ते आठ फूट उंचीच्या 'पीओपी'च्या मूर्ती विदेशात पाठविण्यात आल्या आहेत. सुमारे तीन लाख मूर्तींचे अद्याप अखेरचे रंगकाम सुरू आहे. तालुक्यात मूर्तींच्या व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. (Ganeshotsav 2023)
संबंधित बातम्या :
पेण तालुक्याच्या गावागावांत गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. तालुक्यात किमान 1,100 ते 1,200 च्या आसपास गणेशमूर्ती कारखाने आहेत. या कारखान्यांतून किमान 15 लाख गणेशमूर्ती दरवर्षी तयार होत असतात. या 15 लाख गणेशमूर्तींच्या व्यवसायातून पेण तालुक्यातील गणेशमूर्तींच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होत आहे. रंग व साहित्य, वॉर्निश, 'पीओपी', शाडूची माती, काथ्या साहित्य, चूनखडी, अभ्रक आदी साहित्याची गणपती मूर्तिकारांनी खरेदी-विक्री पेणच्या बाजारपेठेतून केली असून, याचबरोबर तयार झालेल्या मूर्ती टेम्पो, पिकअप, ट्रक आदी वाहनांच्या माध्यमातून इतरत्र पाठविण्यात आल्या आहेत. (Ganeshotsav 2023)
पेणच्या माहेरघरातून तयार होणार्या गणेशाच्या सुबक मूर्ती महाराष्ट्रासह देश-विदेशात रवाना केल्या जात आहेत. गुजरात, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यांसह परदेशात ऑस्ट्रेलिया, अमेरिका, थायलंड, जर्मनी, न्यूझीलंड, जपान आदी देशांत पेण तालुक्यातून तयार झालेल्या गणेशमूर्ती निर्यात झाल्या आहेत. यावर्षी प्रथमच सात ते आठ फूट उंचीच्या 'पीओपी'च्या गणेशमूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अधिक उंचीच्या मूर्ती परदेशात पाठविल्या जात नव्हत्या; पण मॉरिशियससारख्या देशातून सात ते आठ फुटींच्या मूर्तींना मागणी येत आहे.
गणेशमूर्ती व्यवसायाला उद्योगांचा दर्जा मिळाल्यामुळे बँकांकडून होणारा पतपुरवठा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. तसेच विदेशात मूर्ती पाठविण्याच्या प्रक्रियाही सुलभ झाली आहे. मुंबई व पुण्यातील व्यावसायिक पेण येथील सुबक गणेशमूर्तींची खरेदी करून विदेशात पाठविण्याचे काम करतात. शहरातील सुमारे 40 ते 50 कला केंद्रांतून परदेशात गणेशमूर्ती पाठविण्यात येतात. या सर्व उलाढालीतून पेणच्या गणेशमूर्ती बाजारपेठेची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालेली आहे.
कलाकारांनी लाकूड, कागद आणि कापडापासून वैविध्यपूर्ण मखर बनवण्यास प्राधान्य दिले आहे. कागदी मखर, फुलांचे व कापडी मखर, लाकडाचे मखर, साईन बोर्ड यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, या मखरांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. इको-फ्रेंडली असणार्या मखरांमध्ये मंदिर, राजवाडा, कलश, पालखी याबरोबरच पाळणा, मयुरपंख असे विविध प्रकार भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
हेही वाचा :