Nashik | Ganeshotsav 2023 : सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाना मिळणार 11 लाखांचे बक्षिस | पुढारी

Nashik | Ganeshotsav 2023 : सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाना मिळणार 11 लाखांचे बक्षिस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त बंदोबस्ताचे नियोजन करीत शहर व ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक मंडळांना रोख स्वरूपात बक्षीस जाहीर केले आहे. पोलिसांनी दिलेल्या शिस्तीसह मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरात दहा निकषांद्वारे परीक्षण होणार आहे. (Ganeshotsav 2023)

संबधित बातम्या :

पालकमंत्री दादा भुसे यांनी गणेशोत्सवात नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांना रोख अकरा लाख रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस दलांतर्फे पाच लाख आणि शहर आयुक्तालयातर्फे सहा लाखांचे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालय हद्दीत गणेशोत्सव बक्षीस योजना जाहीर केली आहे. त्यानुसार पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि मोनिका राऊत यांच्याकडे समिती नेमण्याची जबाबदारी आहे. त्यामध्ये परिमंडळातील सहायक पोलिस आयुक्त, कला क्षेत्रातील प्राध्यापक, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेचे प्रतिनिधी, शहर वाहतूक शाखेचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. तर विशेष शाखेचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांच्याकडे गणेश मंडळांना नोंदणीसाठी अर्ज व लिंक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. तसेच गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे बक्षीस योजनेच्या आराखड्यासंदर्भात जबाबदारी दिली आहे. (Ganeshotsav 2023)

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल

शहरातील परिमंडळ एक व दोनमधील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पुरस्कार वितरण होणार आहे. दोन्ही परिमंडळ मिळून प्रत्येकी ५-५ पुरस्कार वितरित होतील. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ पुरस्कारांचा समावेश असेल. गणेशोत्सव काळात समिती पाहणीत मंडळांनी निकषांचे पालन केले आहे की नाही याचे निरीक्षण करेल. विसर्जन मिरवणुकीतही निकष लावले आहेत. त्यानंतर अंतिम गुणांकन सादर करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होतील.

पुरस्काराचे निकष : गुण

गणेशमूर्ती स्थापना व संरक्षणार्थ व्यवस्था (मंडप, सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक मर्यादा व इतर) : १०

स्वयंसेवक व शिस्त, स्त्री-पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था, सामाजिक सलोख्याचा देखावा : २०

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावट, स्वच्छता आणि सुविधा : १०

शासकीय नियमांचे पालन, वाहतुकीसंदर्भतील चोख नियोजन : १०

विसर्जन मिरवणुकीतील वाहन, गणेशमूर्तीचे मजबूत आसन, पर्यायी विद्युत पुरवठा : २०

विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक वाद्यांचे स्वरूप व शिस्त : १०

गुलालविरहित मिरवणूक, जातीय सलोख्याचे नियोजन व शिस्त : ३०

मिरवणूक रेंगाळू न देता मार्गस्थ, स्वयंसेवकांची खबरदारी : २०

निर्धारित वेळेत मिरवणुकीत सहभागी होत नियम पाळणे : १०

निर्धारित वेळेत वाद्य बंद, गणेशमूर्तीचे विसर्जन, मंडळाची शिस्त : १०

एकूण गुण : १५०

पर्यावरणपूरक, सामाजिक सलोखा जपणारे आणि शिस्तप्रिय मंडळांना रोख स्वरूपात बक्षिसे देणार आहोत. जेणेकरून नाशिककरांचाही उत्साह सहभाग आणि उत्साह वाढेल.

– अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

हेही वाचा :

Back to top button