डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या गणेशोत्सवात शिवसेनेत सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर आधारीत चलतचित्र देखावा तयार केला. कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रामबाग परिसरात विजय तरुण गणेश मंडळाने हा देखावा केला. या देखाव्यामुळे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी यावर आक्षेप घेतला. बुधवारी पहाटेच्या सुमारास या देखाव्यावर कारवाई करत संबंधित सर्व सामग्री जप्त केली. विशेष म्हणजे गणरायांची मूर्ती स्थानापन्न होण्याआधीच पोलिसांनी कारवाई केल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. (Ganesh Chaturthi 2022)
कल्याण पश्चिम भागातील रामबाग परिसरातील विजय तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त (Ganesh Chaturthi 2022) शिवसेनेतील बंडखोरीवरील देखावा साकारलेला होता. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कल्याण-डोंबिवली महानगरप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी हे या मंडळाचे विश्वस्त आहेत. विशेष म्हणजे मंडळाच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सवामध्ये वर्षातील एखाद्या महत्वाच्या चालू घडामोडीवर देखावा साकारला जातो. यंदाच्या वर्षात सत्तासंघर्ष होऊन शिवसेनेत फूट पडल्याचा देखावा साकारण्यात आला. मात्र ही माहिती मिळताच पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेतला.
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी अनेक भाविक गणेशाच्या दर्शनाबरोबरच मंडळाने केलेली सजावट आणि देखावा पाहण्यासाठी येतात. मात्र यंदाचा देखावा हा आक्षेपार्ह असून यामुळे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता असल्याने पोलिसांनी हा देखावा जप्त करून पोलीस ठाण्यात नेला.
या संदर्भात शिवसेनेचे कल्याण-डोंबिवली महानगरप्रमुख तथा मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, वास्तविक पाहता देखाव्यात काहीही आक्षेपार्ह नव्हते. मात्र तरीही पोलिसांनी पहाटेच्या सुमारास घाईघाईने येऊन कारवाई केली. ही तर हुकूमशाही आहे, आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोतच, शिवाय या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही श्रींच्या मंडपात गणेशमूर्तीची स्थापना करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या या कारवाईनंतर कल्याणकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शिवसेनेच्या गटात एकच खळबळ माजली आहे.
हेही वाचा