निपाणी: निवडणुकीतून माघार; मार्गदर्शकाची भूमिका घेणार : काकासाहेब पाटील | पुढारी

निपाणी: निवडणुकीतून माघार; मार्गदर्शकाची भूमिका घेणार : काकासाहेब पाटील

निपाणी: पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाने आपणास पाचवेळा उमेदवारी दिली होती. त्यापैकी तीन वेळा यश मिळाले, तर दोन वेळा पराभव झाला असून पक्षाची मते काही कमी झालेली नाहीत ती वाढतच गेली आहेत. आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळावे, अशी माझी मनापासून इच्छा होती. विलास गाडीवड्डर यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितले आहे. आमदार किंवा आमदारांच्या मुलांना तिकीट नको, अशी त्यांनी भूमिका मांडली आहे. या सूचनेला आपण सहमत आहोत, त्यामुळे आपण निवडणुकीत उभे न राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपण निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर राहून मार्गदर्शकाची भूमिका घेणार असल्याचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काकासाहेब पाटील यांच्या या पवित्र्यामुळे आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण याची चर्चा रंगली आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले की, गेली ३० वर्षे आम्ही काकासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत. पक्षाने त्यांना ५ वेळा उमेदवारी दिली होती. त्यापैकी ३ वेळा यश मिळाले आहे. आगामी निवडणुकीत आपल्या उपयोगाला पडणारा उमेदवार असावा आपले ऐकून काम करणारा उमेदवार असावा, त्याच्याच नावाची शिफारस आपण करावी. गेली २५ वर्षे काकासाहेब पाटील यांनी पक्ष टिकून ठेवण्याचे काम केले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला तिकीट मिळावे, अशी रघुनाथराव कदम यांची इच्छा होती. त्यांनी त्यावेळी वीरकुमार पाटील यांना निवडून आणून दाखवले आहे.

सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी दिली गेली पाहिजे. कुटुंबाचे राजकारण आता नको. माजी आमदारांच्या मुलांना नेतृत्व करण्याची संधी दिली जाऊ नये, असे स्पष्ट करून सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे का? असा सवाल केला. वीरकुमार पाटील यांना ३३ वर्षात विधानसभा व विधान परिषदेची संधी मिळाली आहे. तसेच पंकज पाटील यांना जिल्हा पंचायतीवर उपाध्यक्ष पद मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीचे तिकीट मागू नये. १९९९ पासून २०१८ पर्यंत आम्ही पक्षासाठी काम केले आहे. आता इच्छुकांच्या यादीत माझ्याबरोबर बाळासाहेब देसाई सरकार यांच्याही नावाचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.

चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की, २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींनी निपाणी विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांची नावे मागितली होती. त्यामुळे पक्षाकडून आतापर्यंत ६ नावे पाठवली गेली आहेत. त्यामध्ये आता विलास गाडीवड्डर व बाळासाहेब देसाई सरकार या दोन नावांचा देखील समावेश करीत आहे. याबाबतच्या मागणीचे पत्र गोकाक येथे जाऊन केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना देणार असल्याचे सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button