नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दोन कोटी रुपयांचे दागिने लुटण्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सकाळी घडला. विशेष म्हणजे आरोपींपैकी एकजण पोलिसाच्या गणवेशात होता. व्यापाऱ्याकडे दागिन्याने भरलेल्या दोन बॅगा होत्या. या दोन्ही बॅगा चोरट्यांनी पळवून नेल्या.
सोन्याचा व्यापारी त्याच्या साथीदारासह दागिने घेऊन चंदीगड व लुधियानाला चालला होता. पहाडगंज भागात आला असताना चार चोरट्यांनी त्यांचा रस्ता अडविला. यातील एकजण पोलिसाच्या वेशात होता. गाडी तपासण्याच्या बहाण्याने या लोकांनी गाडी अडविली. याच दरम्यान दोघांनी व्यापारी व त्याच्या साथीदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकत बॅगा हिसकावून पळ काढला. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.