Danasari Anasuya Seethakka : नक्षली ते मंत्री, जाणून घ्या तेलंगणातील नव्या मंत्री सीताक्का यांचा प्रवास

Danasari Anasuya Seethakka : नक्षली ते मंत्री, जाणून घ्या तेलंगणातील नव्या मंत्री सीताक्का यांचा प्रवास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणामध्ये नुकतेच अनुमुला रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना झाली. या सरकारमध्ये दोन महिला आमदारांना मंत्री झाल्याचे पहायला मिळाले. यापैकी सीताक्का यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली आहे. सीताक्का यांचा संपूर्ण प्रवास संघर्षात्मक आहे. एकेकाळी नक्षली म्हणून शस्त्रे उचलणाऱ्या देनसारी अनुसया सीताक्का (Danasari Anasuya Seethakka) यांनी आज मंत्रीपदाच्या शपथविधीचा कागद हातात घेतल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊया त्यांचा मंत्रीपदापर्यंतचा संपूर्ण प्रवास.

शालेय शिक्षणानंतर नक्षली चळवळीशी जाेडल्‍या गेल्‍या

सीताक्का यांनी १९८८ मध्ये दहावीची परीक्षा दिली. त्यानंतर त्या नक्षलवाद्यांमध्ये सामील झाल्या. काही कालावधीनंतर त्या नक्षली गटाच्या कमांडर देखील बनल्या होत्या. त्यांचा भाऊ आणि पती पोलीस चकमकीत मारले गेले.  हाच काळ सीताक्का यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. त्यांनी नक्षली गटापासून दूर राहण्यास सुरुवात केली. हळूहळू नक्षल्यांपासून सामान्य जीवनाच्या प्रवाहात येण्यासाठी सुरुवात केली. काही कालावधीनंतर सीताक्का यांनी  मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या

आत्मसमर्पण केल्यानंतर सीताक्का यांचे आदिवासींसाठी काम

शरणागती पत्करल्यानंतर सीताक्का जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या उन्नतीसाठी काम करू लागल्या. हळूहळू त्या आदिवासी भागात लोकप्रिय झाल्या, त्यानंतर 2009 मध्ये तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) त्यांना विधानसभेचे तिकीट दिले. मुलुग मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचल्या. मात्र, तेलंगणाच्या स्थापनेनंतर त्यांनी टीडीपीचा निरोप घेतला आणि रेवंत रेड्डी यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

निवडणूक जिंकली आणि हॅटट्रिक केली

तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सीताक्का यांचेही नाव होते. आज त्यांनी तेलंगण मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. मुलुग मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या दानसारी अनुसया ऊर्फ सिताक्का यांनी 33,700 मतांनी विजय मिळवून हॅटट्रिक केली आहे.

2022 मध्ये पीएचडी पूर्ण

सीताक्का यांनी खडतर प्रवास असूनही आपला शैक्षणीक प्रवास सुरू ठेवलेला होता. 2022 मध्ये, त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात पीएचडी पदवी मिळवली. सीताक्का यांच्याकडे ८२ लाखांची संपत्ती आहे. त्यापैकी एक लाख रुपये रोख आहेत. यासोबतच त्यांच्या 3 लाख रुपयांचे 60 ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याची माहिती तेलंगणातील स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news