Telangana CM Revanth Reddy Oath Ceremony | तेलंगणात ‘रेवंत’ राज! मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी यांनी घेतली शपथ | पुढारी

Telangana CM Revanth Reddy Oath Ceremony | तेलंगणात 'रेवंत' राज! मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी यांनी घेतली शपथ

पुढारी ऑनलाईन : काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयानंतर आज तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून ५६ वर्षीय अनुमुला रेवंत रेड्डी यांनी आज शपथ घेतली. तर भट्टी विक्रमार्क यांनी तेलंगणाचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच त्यांच्यासोबत १२ आमदार मंत्री म्हणून शपथबद्ध झाले. राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. हा शपथविधी सोहळा हैदराबादच्या लाल बहादूर स्टेडियमवर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झाला. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित आहेत. (Telangana CM Revanth Reddy Oath Ceremony)

संबंधित बातम्या 

काँग्रेस नेतृत्वाने मंगळवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (CLP) नेते आणि तेलंगणाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. ते तेलंगणातील पक्षाचा चेहरा होते आणि राज्यातील काँग्रेसच्या उल्लेखनीय विजयाचे श्रेय त्यांना देण्यात आले आहे. आता ते तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भारत राष्ट्र समिती (BRS) कडून सत्ता खेचून आणली. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते आणि ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला. विधानसभेच्या ११९ जागा असलेल्या तेलंगणात काँग्रेसने ६४ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत बीआरएसचे के. चंद्रशेखर राव यांना पराभवाचा धक्का बसला होता.

रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात १२ मंत्री

उत्तम कुमार रेड्डी, श्रीधर बाबू, पोन्नम प्रभाकर, कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी, सी दामोदर राजनरसिम्हा, पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, अनुसया सीताक्का, तुम्माला नागेश्वर राव, कोंडा सुरेखा आणि जुपल्ली कृष्ण राव आदी १२ आमदारांनी आज रेवंत रेड्डी यांच्यासोबत शपथ घेतली. मल्लू भट्टी विक्रमार्क यांची तेलंगणाचे उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली असून त्यांनी मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांसमवेत शपथ घेतली.

रेवंत रेड्डींचे पीएम मोदींनी केले अभिनंदन

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या रेवंत रेड्डी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. “…मी राज्याच्या प्रगतीसाठी आणि तेथील नागरिकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देतो,” असे पीएम मोदी यांनी X वरील पोस्टमध्ये केले आहे.

विद्यार्थी नेता ते मुख्यमंत्री, जाणून घ्या रेवंत रेड्डींचा राजकीय प्रवास

तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले रेवंत रेड्डी हे विद्यमान खासदार होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. सी. राव यांचा पराभव झाला. मेहबूबनगरमधील कामारेड्डी मतदारसंघातून निवडणूक लढलेले रेवंत रेड्डी हे ५६ वर्षांचे आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. काही काळ तेलगू देसम पार्टीतही त्यांनी काम केले. त्यानंतर काँग्रेस प्रवेश करत काँग्रेसला पहिल्यांदा तेलंगणा राज्यात सत्ता मिळवून दिली.

२००७ साली पहिल्यांदा ते आंध्र प्रदेश विधानसभेत अपक्ष आमदार निवडून गेले. २००९ मध्ये तेलगू देसम पार्टीमधून लढत वरिष्ठ काँग्रेस नेते गुरुनाथ रेड्डी यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर तेलगू देसम पार्टीच्या वतीने रेवंत रेड्डी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र २०१७ मध्ये तेलगू देसम पार्टीने पदावरून हटवल्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्या केल्या २०१८ मध्ये कोडंगल विधानसभेतून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र २०१९ साली मलकाजगिरी लोकसभा मतदारसंघातून विजयी होत संसदेत पोहोचले. पुढे २०२१ ला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. तेव्हापासून त्यांनी तेलंगणा राज्य अक्षरशः पिंजून काढले. तेलंगणामध्ये काँग्रेसला पोषक वातावरण तयार करण्यात रेवंत रेड्डी यांचा वाटा महत्त्वाचा आहे.

‘टायगर रेवंत’ नावाने ओळख

रेवंत रेड्डी हे त्यांच्या समर्थकांत ‘टायगर रेवंत’ म्हणून ओळखले जातात. रेवंत रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीत तेलंगणातील दिग्गज आणि भारत राष्ट्र समिती (BRS) चे नेते के. चंद्रशेखर राव यांचा सामना केला आणि २०१४ मध्ये तेलंगणाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी काँग्रेसला सत्तेत आणले.

Back to top button