नगर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजण्यास दोन अडीच महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने जोरदार पूर्वतयारी सुरु झाली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणार्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची 10 डिसेंबर ते 29 फेब्रुवारी या कालावधीत मोबाईल व्हॅनव्दारे गावोगावी जनजागृती आणि नागरिकांसाठी मतदान प्रात्यक्षिक केले जाणार आहे. त्यासाठी गोदामातील स्ट्रॉगरुममधील 373 मतदान यंत्रे वापरली जाणार आहेत. गेल्या लोकसभेसाठी एप्रिल व मे महिन्यात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक देखील याच कालावधीत होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून निवडणुकीची पूर्वतयारी सुरु आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे मतदान यंत्रे बेंगलोर येथून आणण्यात आली. या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) केल्यानंतर 9 हजार 890 बॅलेट युनिट, 5 हजार 567 कंट्रोल युनिट आणि 6 हजार 17 व्हीव्हीपॅट ही यंत्रे मतदानासाठी सज्ज केली आहेत. ही मतदान यंत्रे एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्रॉगरुममध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवलेली आहे.
5 जानेवारीला मतदार यादी
गेल्या दोन तीन महिन्यांपासून मतदार यादी बिनचूक करण्यात येत आहे. यामध्ये नवीन मतदारनोंदणी, दुरुस्ती, वगळणी आदी आदी कामे सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी वापरली जाणारी अंतिम मतदारयादी 5 जानेवारीला प्रसिध्द होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदारांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने 10 डिसेंबर ते 29 फेब्रुवारी या कालावधीत गावोगावी जाऊन नागरिकांना मतदान प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. मतदान प्रात्यक्षिक आणि जनजागृतीतून नागरिकांमधील भीती दूर करणे आणि आणि मतदानाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्यामुळे 10 डिसेंबरपासून गावोगावी मतदान यंत्रे घेऊन मोबाईल व्हॅन फिरताना दिसणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात देखील मतदान यंत्रांची जनजागृती आणि मतदान प्रात्यक्षिक केंद्र असणार आहे. कामानिमित्त कार्यालयात येणार्या नागरिकांसाठी ही सोय केली जाणार आहे.
राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थित यंत्रे बाहेर
जिल्ह्यात एकूण 3 हजार 731 मतदान केंद्र आहेत. एकूण मतदान केंद्रांच्या 10 टक्के म्हणजे 373 मतदान यंत्रे जनजागृती आणि प्रात्यक्षिकासाठी वापरली जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गोदामामधील स्ट्रॉगरुममधील यंत्रे गुरुवारी सकाळी 11 वाजता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बाहेर काढली जाणार आहेत.या सर्व पक्रियेचे व्हिडिओ शुटींग केले जाणार आहे.