पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय होणार पुण्यात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा

देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील पुणे शहरात उभारण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बुधवारी पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी येत्या आर्थिक वर्षात पाच कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे.

या बैठकीत सन 2022-23 या वर्षाकरिता 429.65 कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. सध्या बालभारतीच्या ग्रंथालयात 1837 पासूनची पाठ्यपुस्तके जपून ठेवली आहेत. या पुस्तकांसह या संग्रहालयात अनेक प्राचीन आणि दुर्मिळ पाठ्यपुस्तके अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याद्वारे पाठ्यपुस्तकांचा उद्देश, रचना, वैशिष्ट्य, स्वरूप आणि इतिहास यांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अन्य राज्यातील पाठ्यपुस्तकेही एकत्र केली जाणार आहेत.

त्याचबरोबर येत्या वर्षापासून इयत्ता 11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल या विषयाकरिता प्रयोगवही बालभारतीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पूर्वी पर्यावरण शिक्षण, जलसुरक्षा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणितया विषयांसाठी प्रयोगवह्या दिल्या जात होत्या.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news