पुणे: नदीत बुडालेल्या शेतमजूराचा मृतदेह ४२ तासानंतर सापडला

पुणे: नदीत बुडालेल्या शेतमजूराचा मृतदेह ४२ तासानंतर सापडला
Published on
Updated on

ओतूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: उदापुरमधील (ता. जुन्नर) पुष्पावती नदीत मुथाळणे येथील रहिवाशी असलेला शेतमजूर बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी जुन्नर येथील रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न केले. दोन दिवस शोध मोहीम चालू होती. अखेर तब्बल ४२ तासानंतर गुरुवारी (दि. ८) सकाळी ८ वाजता ग्रामस्थांच्या मदतीने त्या व्यक्तीचा मृतदेह मिळून आला.

बाळू तुकाराम गभाले (वय ५५, रा. गावठाण वाडी, मुथाळणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मंगळवारी (दि. ६) दुपारी २ वाजता शेतातील फ्लॉवर काढून झाल्यावर बनकर फाटा येथील पुलाजवळ अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते नदीत उतरले. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे व अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहत गेले. त्यांच्या समवेत असणाऱ्या काही ग्रामस्थांनी त्यांना पाहिले व वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी ठरले.

याबाबतची माहिती समजताच ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे, पोलिस उपनिरीक्षक आकाश शेळके, रोहित बोंबले, शांताराम भवारी, देवराम धादवड, धनंजय पालवे, नरेंद्र गोराने, संदीप लांडे,बापू साबळे,पोलीस मित्र छोटू मनियार, श्याम धाय्या हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच, जुन्नर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. जुन्नर रेस्क्यू टीम सदस्य राजकुमार चव्हाण, सुदर्शन कांबळे, अमोल पंडित, आदित्य आचारी, आतिफ सय्यद, नागेश मानकर, सुनील शिंदे, संकेत कबाडी, लखन डाडर या सदस्यांनी सायंकाळी नगर-कल्याण महामार्गावरील पुलापासून काळभैरवनाथ पुलापर्यंत दोन वेळा नदीतून पाहणी केली. मात्र, ते सापडले नाहीत.

बुधवारी सकाळी परत स्थानिकांच्या मदतीने नदी परिसरात शोध मोहीम सुरू झाली. वाहते पाणी थांबविण्यासाठी अखेर काही काळ मृताच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलनही केले. त्यानंतर पिंपळगाव जोगा धरणाचे ढापे बंद करण्यात आले. त्यानंतर या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान घटनास्थळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, बबन तांबे, महेंद्र सदाकाळ, पंडित मेमाने, तुषार थोरात, सरपंच सचिन आंबडेकर, बबनदादा कुलवडे, रोहकडीचे सरपंच सचिन घोलप, यांसह पोलीस पाटील अमित ठोसर, राजेंद्र लोहोटे, महसूल अधिकारी यांची टीम देखील घटनास्थळी हजर होती.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news