पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी बुधवारी (दि. 25) भाजपला धक्का देत शिवसेनेत (उद्धव ठाकरे) प्रवेश केला. मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. तसेच, पवार यांच्यावर संघटकपदाची जबाबदारी सोपवित असल्याची घोषणा केली. एकनाथ पवार यांनी रविवारी (दि. 22) भाजपच्या प्रवक्ते पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण हा राजीनामा देत असल्याची भूमिका पवार यांनी घेतली होती. तसेच, पाटील यांच्या आंदोलनात आक्रमकपणे उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. पवार हे भाजपमधून बाहेर पडून शिवसेना (उद्धव ठाकरे) गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. ते लवकरच मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधतील, असेही बोलले जात होते.
त्या पार्श्वभूमीवर, बुधवारी (दि. 25) पवार यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत मातोश्री गाठली. तसेच, शिवसेनेमध्ये (उद्धव ठाकरे) प्रवेश केला. या प्रसंगी नेते व खासदार संजय राऊत, प्रवक्ते व खासदार विनायक राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पवार म्हणाले की, मी नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघात 4 वर्ष काम केले आहे. येथे विकास आढळत नाही. त्यामुळे लोहा-कंधारच्या विकासासाठी निश्चितपणे काम करेन. येथील आमदार हा 100 टक्के शिवसेनेचा असेल. नांदेड जिल्ह्यात शिवसेना क्रमांक एकवर घेऊन जाऊ. एकनाथ पवार यांच्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष प्रवेशाबाबत भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.
एकनाथ पवार हे सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात येत आहेत. ही सध्याच्या राजकारणात दुर्मिळ नव्हे तर अशक्य अशी घटना आहे. पवार यांना संघटना बांधण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे संघटक म्हणून त्यांच्यावर शिवसेनेत सोपविलेली जबाबदारी ते उत्तम रितीने पार पाडतील, असे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपण भाजप पक्ष सोडला आहे. त्यामुळे आपण आंदोलनाला कमी पडणार नाही. मराठा आरक्षणाला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दिलेला आहे. पक्षामध्ये मला सोपविलेली जबाबदारी मी चोख पार पाडेन.
– एकनाथ पवार.