Beed Accident : बीड-अहमदनगर मार्गावर दोन भीषण अपघात; १० जण ठार | पुढारी

Beed Accident : बीड-अहमदनगर मार्गावर दोन भीषण अपघात; १० जण ठार

बीड, पुढारी वृत्तसेवा : धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या ट्रकला आष्टी तालुक्यातील दौलावडगाव जवळ रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. २५) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. तर दुसरा अपघात गुरुवारी (दि.२६) सकाळी साडेसहा वाजता झाला. बीड येथील सागर ट्रॅव्हल्स पलटी झाली, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. इतर अनेक प्रवासीही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस घटनास्थळी दाखल झाले होते.

संबंधित बातम्या : 

अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (क्र. एम एच २१एक्स ८६००) हा धामणगाव कडून अहमदनगर दिशेने जात होता. रात्री साडे अकरा वाजेदरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने (क्र. एम एच १६ क्यू ९५०७) जोरदारची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, (वय ३५, रा. धामणगाव ता. आष्टी), मनोज पांगु तिरपुडे, पप्पू पांगू तिरखंडे, (दोघे रा. जाट देवळा, ता. पाथर्डी) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, (वय ३५, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी) यांचा मॅक केअर हॉस्पीटल, अहमदनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, (वय ४५, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मॅक केअर हॉस्पीटल अहमदनगर येथे उपचार सूरू आहेत.

दुसऱ्या अपघातात मुंबईकडून बीडकडे जात असलेल्या सागर ट्रॅव्हल्सला झाला. चालकाचा ताबा सुटल्याने सकाळी साडेसहा दरम्यान ट्रॅव्हल्स पलटली. हा अपघात आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील आष्टा फाटा नजीक झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना आष्टी व नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button