नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) हवाला प्रकरणाच्या अनुषंगाने पुन्हा समन्स बजावले आहे. कोळसा घोटाळ्यातला पैसा अभिषेक यांच्यापर्यंत पोहोच झाल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. अभिषेक यांच्या पत्नी रुजीरा यांनाही 'ईडी'ने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठविले आहे. ( coal smuggling case )
'ईडी'च्या निर्देशानुसार पुढील आठवड्यात अभिषेक आणि रुजीरा यांना चौकशीसाठी हजर रहावयाचे आहे. 'ईडी'च्या समन्सला आक्षेप घेत बॅनर्जी दाम्पत्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र 11 मार्च रोजी त्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. अभिषेक आणि रुजीरा यांना गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ईडीने नोटीस बजावली होती. आपण प. बंगालचे रहिवासी आहोत, मात्र जाणूनबुजून दिल्लीला चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा काढल्या जात असल्याचा आक्षेप त्यावेळी बॅनर्जी दाम्पत्याने घेतला होता. अभिषेक बॅनर्जी यांनी एकवेळ दिल्लीला येउन ईडी कार्यालयात हजेरीही लावली होती.
हवाला प्रतिबंधक कायदा 2002 नुसार ईडीने बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. ईस्टर्न कोलफील्ड कंपनीच्या खाणींतून अवैधपणे खणन करण्यात आलेल्या कोळशाचा पैसा बॅनर्जी यांना प्राप्त झाला असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. कोळसा खणन माफिया अनुप मांझी हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे.
हेही वाचलं का?