Earthquake : इंडोनेशिया हादरले; तीव्र भूकंपानंतर आता त्सुनामीचाही इशारा
पुढारी ऑनलाईन: इंडोनेशियामध्ये सोमवारी मध्यरात्री जोरदार भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप ७.७ रिश्टर इतक्या तिव्रतेचा होता. यामुळे संपूर्ण इंडोनेशिया हादरले आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरात होते की, डार्विनसह उत्तर ऑस्ट्रेलियातही या भूकंपाचे धक्के जाणवले. या तिव्रतेच्या धक्क्यानंतर आता इंडोनेशियात त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्रने (EMSC) सांगितले आहे की, इंडोनेशियातील तनिंबर भागात हा भूकंप झाला. EMSC ने म्हटले आहे की भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली ९७ किमी खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे ३.१७ मिनिटांनी हा भूकंप झाला. हा भूकंप पूर्व तिमोर या छोट्या आशियाई देशाच्या ईशान्येला झाला आणि त्याचे केंद्र बांदा समुद्रात होते.
काही वृत्तानुसार, डार्विन शहरात चार मिनिटांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहितीही समोर आली आहे. इंडोनेशियामध्ये यासारखे तीव्र भूकंप अनेकदा होतात, काहीवेळा विनाशकारी त्सुनामी येतात. इंडोनेशियामध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो.
यापूर्वी इंडोनेशियामध्ये नोव्हेंबर २०२२ मध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जावा प्रांतातील भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर इतकी होती. या भूकंपात ३१८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय ६२ हजारांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले होते.