पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे रब्बी पिकांखालील एकूण सरासरी क्षेत्र 2 लाख 29 हजार 712 हेक्टर असून त्यापैकी 1 लाख 22 हजार 240 हेक्टवरील (53) पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे ज्वारी पिकाच्या पेरणीला 'ब—ेक' लागला असून 55 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर ज्वारीच्या एकूण सरासरी क्षेत्रामधील 60 हजार हेक्टरइतके मोठे क्षेत्र सध्यातरी नापेर राहण्याची दाट शक्यता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी व्यक्त केली. मागील पंधरवड्याच्या तुलनेत गहू, हरबरा पेरणीच्या क्षेत्रात आणखी वाढ झालेली आहे.
संबंधित बातमी :
दरम्यान, पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र 1 लाख 34 हजार 336 हेक्टर असून त्यापैकी 74 हजार 142 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. आता ज्वारीचा पेरणी हंगाम संपुष्टात आला आहे. त्यामुळे सरासरी क्षेत्रामधील सुमारे 60 हजार 194 हेक्टर (45 टक्के) क्षेत्र नापेर राहणार असल्याचे कृषी विभागाच्या ताज्या पेरणी अहवालातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात ज्वारीचे पीक कमी हाती येण्याचा प्राथमिक अंदाजही त्यांनी वर्तविला.
रब्बी हंगामात गव्हाचे सरासरी क्षेत्र 30 हजार 803 हेक्टरइतके आहे. त्यापैकी 12 डिसेंबरच्या अहवालानुसार 16 हजार 164 हेक्टरवर (41 टक्के) पेरणी पूर्ण होऊ शकली आहे. गव्हाच्या क्षेत्रात मागील पंधरवड्याच्या तुलनेत 5 हजार 557 हेक्टरने वाढ झालेली आहे. जिल्ह्यात अद्यापही गव्हाची पेरणी सुरु असल्याने क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हरभरा पिकाखालील सरासरी क्षेत्र 34 हजार 330 हेक्टर असून त्यापैकी 12 हजार 401 हेक्टरवर म्हणजे 36 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पंधरवड्यात 3 हजार 134 हेक्टरने हरभरा पेरणीत वाढ झाल्याचे दिसून आले. दुष्काळी स्थितीत जनावरांच्या चारा पिकांमध्ये शेतकरी मक्याच्या पेरणीस प्राधान्य देतात. जिल्ह्यातील मका पिकाखालील सरासरी क्षेत्र 16 हजार 947 हेक्टर आहे. त्यापेक्षा अधिक म्हणजे 18 हजार 315 हेक्टरवरील (108 टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे.