Nashik News : शेतकरी पुत्राची दुसऱ्यांदा अधिकारी पदाला गवसणी

सुरज वानले
सुरज वानले
Published on
Updated on

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येथील लक्ष्मीनगरमधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने दुसऱ्यांदा अधिकारी पदाला गवसणी घालत परिवारातील सदस्यांचे अश्रू पुसण्याची कौतुकास्पद कामगिरी केली.

सोमवारी (दि. ११) रात्री उशिरा महाराष्ट्र राज्य सहकार व पणन विभागा अंतर्गत झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात येथील सुरज विठ्ठल वानले याने घवघवीत यश संपादन करत थेट सहकार अधिकारी श्रेणी २ या (नाशिक विभाग) पदाला गवसणी घातली आहे. सुरजचे वडील विठ्ठल वानले हे शेतकरी असून, शेती उत्पन्न कमी होत असल्याने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. तर आई गृहिणी आहे. जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सुरजने हुशारीची चुणूक आधीपासूनच दाखवायला सुरुवात केली होती. याआधीही त्याने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) या विभागा अंतर्गत झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत लिपिक पद मिळवले होते.

विज्ञान शाखेतील पदवीधर असलेल्या सुरजने पदवीनंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता. येथील अभ्यासिकेतील अभ्यासाच्या जोरावर यशदा संस्थेची प्रवेश परीक्षा पास होत त्या संस्थेमध्येही १ वर्षाचे प्रशिक्षण वर्ग पूर्ण केले होते. त्याचा फायदा त्याला पुढील परीक्षेत झाला. एमपीएससीच्या वनसेवा परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत त्याने मजल मारली होती. मात्र अवघ्या काही गुणांमुळे ती संधी हुकली. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या सन २०२२ व २०२३ च्या मुख्य परीक्षेस पात्र असून त्याचीही तयारी तो करत आहे. नियमित केलेला अभ्यास व जिद्दीने उभे राहून कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर सहकार अधिकारीपदी विराजमान झाला आहे. निकाल समजताच कुटुंबातील सदस्यांनी व मित्र परिवाराने डीजेच्या तालावर सुरजची मिरवणूक काढली, तर औक्षण करताना उपस्थित सर्वांनीच अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आता यश मिळत असल्याने मनोमन समाधान मिळाले आहे. मात्र मागे वळून बघितल्यास अंगावर काटा उभा राहतो. माझ्या यशात कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक व मित्र परिवाराच्या पाठिंब्याची मोठी भूमिका आहे. स्पर्धा परीक्षेच्या बाहेरही एक सुंदर जग आहे.

– सुरज वानले, ओझर (सहकार अधिकारी)

हेही वाचा ;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news