दूध व्यवसायाला स्थैर्य मिळणार कधी? | पुढारी

दूध व्यवसायाला स्थैर्य मिळणार कधी?

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा :  शेतमालाच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी कर्जाच्या खाईत पुरता अडकत चालला असतानाच दुधाच्या दरात मोठी घसरण झाली असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. दुधात भेसळ करून अतिरिक्त दूध वाढवणार्‍यावर नियंत्रण न ठेवता तसेच दूध दराबाबत उदासीनता दाखवणार्‍या शासनाच्या धोरणाबाबत शेतकर्‍यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दूध व्यवसायाची उतरती कळा थांबून दूध व्यवसायाला स्थैर्य मिळणार कधी ? असा उद्विग्न सवाल दूध उत्पादक शेतकरी करत आहेत. मागील काही महिने दूध उत्पादक शेतकर्‍यांना दुधाला प्रतवारीनुसार प्रतीलिटर 35 ते 40 रुपये भाव मिळत असल्यामुळे दूध देणार्‍या गाई व म्हशींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या, त्यामुळे शेतकर्‍यांना दूध व्यवसायासाठी 50 ते 90  हजारांपर्यंतच्या संकरित गायी खरेदी कराव्या लागल्या.
संबंधित बातम्या :
आता दूध खरेदी दरात घसरण होऊन प्रतीलिटर  10 – 12 रुपयांनी घट झाल्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक केलेले दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. बँका, सोसायटी, खासगी पतसंस्थांचे कर्ज काढून गायी, म्हशी खरेदी केलेल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक अवस्थाही बिकट झाली आहे. दुष्काळ परिस्थितीने हिरव्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे.  पशुखाद्याच्या दरातही भरमसाठ वाढ झाली आहे. पशुखाद्याच्या 50 किलोच्या बॅगेमागे 150-200 रुपयांनी वाढ झाली आणि आता दुधाच्या दरात 10 ते 12 रुपयांनी घट झाल्याने  दूध व्यवसाय करणारे शेतकरी पुरते संकटात सापडले आहेत. दुधाची पावडर निर्यात अनुदान योजनेबाबत शासनाच्या उदासीनेतेमुळे कारखाने, दूध संकलन संस्थांबरोबरच पावडरनिर्मिती करणारे उद्योग व  दूध उत्पादकांनाही अडचणीत आणले आहे.
दुधाची पावडर करण्यास प्रोत्साहन हवे
दुधाची पावडर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे. दुधाची पावडर करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान योजना राबवून, योग्य निर्यात धोरणाची अंमलबजावणी करून दूध व्यवसायाला स्थैर्य मिळण्यासाठी शेती व दूध व्यवसायाची सांगड भक्कम करण्याचा प्रयत्न करण्याची मागणी दूध उत्पादक शेतकर्‍यांमधून होत आहे.

Back to top button