पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाला सुरुवात होताच गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फूल व फळबाजारासह शहर व उपनगरांतील अन्य बाजारपेठा गर्दीने गजबजू लागल्या आहेत. लाडक्या गणरायाच्या नित्यपूजेसाठी हार लागत असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात फुलांना मागणी वाढली असून, फुलांना चांगला भाव आला आहे. तर, प्रसादासाठी फळांचा वापर होत असल्याने फळांनाही चांगली मागणी आहे. पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात जिल्ह्यासह सोलापूर, वाई, सातारा आदी भागांतून झेंडूच्या फुलांची, तर कर्नाटकातूनही मारिगोल्ड जातीच्या शेवंतीची सर्वाधिक आवक होत असते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढत आहे. मागणीही चांगली असल्याने गेल्या महिनाभरापासून पडलेले फुलांचे भाव वाढत आहेत. बाजारात दाखल होत असलेल्या फुलांच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने झेंडू, शेवंतीच्या भावात वीस ते तीस टक्के वाढले तर गुलछडीचे भाव दुपटीने वाढले आहेत. गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने पुढील दहा दिवस फुलांचे भाव तेजीतच राहणार असल्याचे अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले. याखेरीज गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या तीन ते चार दिवस आधी पूजेच्या वाट्यासाठी केळी, सफरचंद, पेरू, चिकू, सीताफळ आदी फळांना मोठी मागणी
राहिली. त्यानंतर या फळांना मागणी कमी झाली. मात्र, प्रसादासाठी सफरचंद, केळी आदी फळांना मागणी कायम आहे. देशासह परदेशातून सफरचंद तसेच पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात केळी बाजारात दाखल होत आहे. आवक-जावक कायम असल्याने त्या सर्वांचे दर स्थिर असल्याचेही अडतदार युवराज काची यांनी सांगितले.
पुणे शहर व जिल्ह्यासह मुंबई, कोकण, ठाणे, पनवेल, दादर व काही प्रमाणात गोवा भागातील खरेदीदारांकडून फुलांची खरेदी होत आहे. झेंडू, शेवंतीचे भाव चांगले वाढले असून, गुलछडीचे भाव दुप्पट झाले होते. पुणे जिल्हा वगळता इतरत्र पावसाचा फटका नाही. त्यामुळे यंदा दर्जेदार फुलांना चांगला भाव मिळेल.
– सागर भोसले,
समन्वयक, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन
हेही वाचा