Ganeshotsav 2023 : रांगड्या कोल्हापुरी कलापथकांची मुलूखगिरी

Ganeshotsav 2023 : रांगड्या कोल्हापुरी कलापथकांची मुलूखगिरी

कोल्हापूर; सागर यादव : प्राचीन कृषी संस्कृतीतील सण-उत्सव-समारंभ आणि लोककला यांचे अतूट नाते आहे. यामुळेच प्रत्येक सण-उत्सवात लोककलांना विशेष महत्त्व असते. कलानगरी कोल्हापुरातील वैशिष्ट्यपूर्ण रांगड्या लोककला पथकांना सण-उत्सवात विशेष मागणी असते. यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळीसह विविध सण-उत्सवांसाठी कोल्हापूरच्या कलापथकांना देशभरात आणि विदेशातही मागणी असते. यामुळे कोल्हापुरी कलापथके मुलूखगिरीसाठी सदैव सज्ज असतात.

लोककला पथकांची विविधता

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात विविध कलांना राजश्रय दिला. यामुळे कोल्हापूरची ओळख सर्वदूर कलानगरी अशी झाली आहे. चित्र-शिल्प कलेप्रमाणेच शाहूकाळात कोल्हापुरात इतर कलागुणांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. स्फूर्तिदायी इतिहास सांगणारे पोवाडा पथक, मर्दानी खेळांचे युद्धकला पथक, भक्तिभाव निर्माण करणारे भजनी मंडळ, प्रबोधन करणारे सोंगी भजन पथक, मंगलमय सुरांचे सनई-चौघडा पथक, ठेका धरायला लावणारे लेझीम व हलगी पथक, घुंगरांच्या तालावर नाचविणारे तमाशा पथक, पारंपरिक बाज जपणारे धनगरी ढोलपथक या जुन्या काळातील पथकांसोबतच नव्याने विकसित झालेले झांजपथक, ढोलताशा पथकांचा विकास कोल्हापुरात झाला.

अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन

सण-उत्सवांपासून ते सामाजिक व घरगुती समारंभात लोककलाकारांना मोठी मागणी असते. यामुळे लोकांच्या आवड-निवडीनुसार कलापथके विकसित झाली. विविध वयोगटांतील अगदी दोन-चार लोकांपासून ते शंभर लोकांपर्यंतची पथके आज सक्रिय आहेत. वर्षभर धार्मिक सण-उत्सव, राष्ट्रपुरुषांच्या जयंती, राष्ट्रीय दिन, ऐतिहासिक दिनविशेष व नियमित सोहळे, शासकीय कार्यक्रम यासह विविध कार्यक्रमांत सादरीकरणासाठी या पथकांना आमंत्रित केले जाते. यामुळे पथकांचा सराव सातत्याने सुरू असतो. कार्यक्रमाची वेळ आणि महत्त्व यानुसार अगदी 11 हजार रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंतची सुपारी या पथकांना मिळते. परदेशातील सुपारीसाठी हा आकडा 5 ते 10 लाखांपर्यंत असतो. कलापथकांसाठी लागणार्‍या ड्रेफरीपासून ते आवश्यक साहित्य, वाद्यवृंद, साऊंड व लाईट सिस्टीम अशा अनेक गोष्टींमुळे पथकांत अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. यामुळे ही कलापथके अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहेत.

आधुनिक काळातही पारंपरिक लोककलांचे महत्त्व अबाधित आहे. यामुळेच प्रत्येक सण-उत्सव-समारंभात लोककला पथकांना मोठी मागणी असते. या पथकांच्या माध्यमातून अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

– शाहीर रंगराव पाटील, शाहिरी पोवाडा पथक

लोकाश्रयामुळे पारंपरिक कलागुणांना प्रोत्साहन मिळत असल्याने त्यांच्या जतन-संवर्धन-संरक्षणाचे काम होत आहे. पूर्वजांचे कलागुण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही कलापथके मार्गदर्शक ठरत आहेत.

– राम यादव, शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news