पुणे, पुढारी वृत्तसेवा: हेरगिरी प्रकरणावरून एटीएस (दहशतवादी विरोधी पथक) तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेला डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी एटीएसकडून त्याची 'व्हॉईस लेअर सायकॉलॉजिकल एनालिसिस टेस्ट' करू देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली होती. या टेस्टला कुरुलकरच्या वकिलांनी कडाडून विरोध करीत मानवी हक्कावर गदा येत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे दाखले दिले. न्यायालयाने ७ जुलै रोजी निर्णय घेणार असल्याचे सांगून सुनावणी पुढे ढकलली.
भारतातील संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य बनवून त्यावर संशोधन करणाऱ्या दिघी येथील 'डीआरडीओ'त (संरक्षण संशोधन व विकास संस्था) कुरुलकरच्या नेतृत्वात स्वदेशी बनावटीच्या रॉकेट लाँचरसह 'पिनाका' व 'विभव' या लांब पल्ल्याच्या रॉकेट लाँचरचे संशोधन झाले. असे असतानाही कुरुलकरचे संबंध एका ललनेच्या माध्यमातून पाकिस्तानी इंटेलिजन्सशी जुळले. पाकिस्तानी एजंट असलेल्या झारादास गुप्ताने कुरुलकरला मोहजालात ओढले. कुरुलकरच्या हालचालींवर संशय आल्याने त्याचे ई-मेल तपासले असता ते मेल पाकिस्तानी ई-मेलवर गेल्याचे सिद्ध झाल्यानंतर खात्यांतर्गत चौकशी होऊन ३ मे २०२३ रोजी एटीएसने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. दरम्यान, त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या लॅपटॉप व मोबाईलचा पासवर्डही त्याने न दिल्याने ते उघडण्यासाठी गुजरात फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले. याबरोबरच त्याची 'व्हॉईस लेअर सायकॉलॉजिकल एनालिसिस टेस्ट' करणे गरजेचे असून, त्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली होती.
शुक्रवारी (दि. ३०) कुरुलकरचा बचाव करीत ॲड. ऋषिकेश गानू यांनी न्यायालयात एटीएसने दाखल केलेल्या जबाबाचे पुरावे दिले. सर्व साहित्य त्यांच्याच ताब्यात असून, कुरुलकरने कोणाशी संवाद साधला, हे निष्पन्न झाले असल्याचे सांगितलेले आहे. इस्राईलकडून मागविलेल्या यंत्रात असे काय आहे, की ज्याचा वापर करून खूप काही माहिती बाहेर येईल, असा मुद्दा उपस्थित करीत त्या टेस्टची परवानगी देऊ नये, अशी विनंती करण्यात आली.
हेही वाचा: