पुणे होणार ईलेक्ट्रीक वाहनांचे हब, बारा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक | पुढारी

पुणे होणार ईलेक्ट्रीक वाहनांचे हब, बारा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: माहिती आणि तंत्रज्ञान (आय.टी.हब) क्षेत्रातील अतिउच्च शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्याची आता ‘ईव्ही हब’ अशी ओळख होणार आहे. शहर आणि जिल्ह्यात पुढील काळात इलेक्ट्रीक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणार आहे. त्याचबरोबर या वाहनांसाठी अत्यंत आवश्यक असलेले स्पेअर्स पार्टस त्यामध्ये बॅटरी, आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशनच्या साडेतरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले प्रकल्प सुरू होणार आहेत. या प्रकल्पांमुळे पुण्यात ‘ईलेक्ट्रीक वाहन तयार करण्याबरोबरच ‘बॅटरी स्वॅपिंग स्टेशन’ची निर्मितीही केली जाणार आहे.

राज्य मंत्रीमडळाची बैठक बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यामध्ये विविध प्रकल्पांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये बहुतांश प्रकल्प हे पुणे शहर आणि जिल्ह्यात येणार आहेत. ई.व्ही.चे प्रकल्प पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहेत. त्यामध्ये गोगोरा इंडिया, एथर एनर्जी आणि पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स अशा तीन कंपन्या पहिल्या टप्प्यामध्ये 13 हजार 500 कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक करणार असून, त्याद्वारे हजारो रोजगार उपलब्ध होतील, असे उद्योग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गोगोरा इंडिया या कंपनीचे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांमध्ये प्रकल्प असणार आहेत. तर देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा प्रकल्प पुण्यात असणार आहे. या प्रकल्पाद्वारे भविष्यात 12 हजार ‘बॅटरी स्वॅपिंग स्टेशन’ तयार करणार असून महाराष्ट्रात ‘बॅटरी स्वॅपिंग’चे जाळे निर्माण करण्यात येणार आहे.

‘गोगोरा’कडून ईव्ही आणि बॅटरी निर्मितीही करण्यात येणार आहे. गोगोरा’प्रमाणेच ‘पिनॅकल मोबिलिटी’तर्फे उभारला जाणारा प्रकल्प व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देणार आहे. या प्रकल्पात इलेक्ट्रिक बस, ट्रक, कंटेनर अशा वाहनांच्या निर्मितीसह अद्ययावत इलेक्ट्रिक वाहननिर्मिती सुविधा या प्रकल्पाद्वारे उपलब्ध करण्यात येणार आहे. हायड्रोजनवर चालणार्‍या वाहन निर्मितीची सुविधाही या प्रकल्पात विकसित केली जाईल. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या ईव्ही क्षेत्रातील 10 हजार कोटी रुपये गुंतवणुकीबरोबरच टाटा समूहाच्या ‘ईव्ही’ निर्मितीच्या प्रकल्पालाही यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

पुण्यात इलेक्ट्रॉनिक पार्क होणार असल्याने ‘ईव्ही’साठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक उत्पादनही होणार आहे. बॅटरी स्वॅपिंग स्टेशनच्या जाळ्यामुळे ‘ईव्ही’च्या वापरामध्ये पुणे परिसरात वाढ होईल. याबरोबरच बजाज कंपनी मुंढव्यात पाच हजार कोटी रूपये गुंतवणूक करून डेटा प्रकल्प उभारणार आहे.

हेही वाचा:

पहाटेचा शपथविधी; मी डबलगेमच केला : शरद पवार यांची स्पष्ट कबुली

पुणे जिल्ह्यातील कडूस गावाला आले पोलिस छावणीचे स्वरूप

पुणे : चांदणी चौकातील ऐन रहदारीत स्टेअरिंग रॉड तुटून टेम्पो ट्रॅव्हलर पलटी

 

 

Back to top button