पुणे : मुढाळे ते लोखंडवाडी रस्त्याचे काम संथगतीने | पुढारी

पुणे : मुढाळे ते लोखंडवाडी रस्त्याचे काम संथगतीने

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  मुढाळे (ता. बारामती) येथील माध्यमिक विद्यालय ते लोखंडवाडीदरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेले रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. परिसरातील शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी काम मार्गी लावावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चार किलोमीटर रस्त्यासाठी दोन कोटी 30 लाख रुपये निधी मंजूर झाला. 31 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेले काम 30 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही अर्धवट राहिले आहे. संबंधित ठेकेदार व अधिका-यांकडून काम पूर्णत्वाकडे जाण्यासाठी दुर्लक्ष होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून काम रखडले असल्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नसल्याने ऐन पावसाळ्यात रस्ता खराब होण्याची शक्यता आहे. किरकोळ कारणावरून दोनवेळा चालू कामातील मशीन अन्य ठिकाणी नेल्याने काम रखडले. पावसाळ्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे जिकिरीचे होणार आहे. लोखंडवाडी, जायपत्रेवाडी, थोरात मळा, साळुंके वस्तीकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. संथ गतीने चाललेल्या कामात आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी हरकत घेतल्यास काम थांबवले जाते. अधिकार्‍यांनी गटानुसार मोजमापे करून शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित आहे. काम पूर्ण व्हावे, याबाबत संबंधित मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांना ग्रामस्थांनी सूचना केली आहे. रस्त्याची पाहणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली असून, सूचनाही केल्या होत्या. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काम अपूर्ण राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

Back to top button