सामाजिक सलोखा बिघडवताय? सावधान ! भडकविण्याची भाषा केल्यास होईल कारवाई

सामाजिक सलोखा बिघडवताय? सावधान ! भडकविण्याची भाषा केल्यास होईल कारवाई

पुणे : सोशल मीडियातून धार्मिक व जातीय तणाव वाढविणार्‍या पोस्ट फॉरवर्ड करीत असाल तर जरा जपून! कारण, पोलिस आयुक्त थेट अशा मेसेज करणार्‍यांवर कारवाई करण्यास पुढे आले आहेत. भडकविण्याची भाषा करून वातावरण दूषित करणार्‍यांना थेट लॉकअपमध्ये टाकण्याचा (गुन्हा दाखल करून अटकेच्या कारवाईचा) इशारा आयुक्त रितेश कुमार यांनी दिला आहे. त्यासंबंधीच्या सर्व ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांसह इतर विभागांना सूचना देत टि्वट देखील केले आहे.

राज्यातील वातावरण दंगलींनी अशांत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना भडकविणारे संदेश फिरतात. याला लगाम लावण्यासाठी पुणे पोलिसांचा सायबर विभाग तसेच स्थानिक पोलिस कामाला लागले आहेत. डोळ्यांत तेल घालून या विभागाची विविध पथके सक्रिय झाली आहेत. तर, राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांकडून पसरविले जाणारे टि्वट, संदेश, स्टेटस तसेच सामाजिक माध्यमे अत्यंत बारकाईने तपासून गुन्हा करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या तयारीत पुणे पोलिस आहेत.

राजकीय वादात कारण नसताना अत्यंत खालच्या थराला जाऊन गलिच्छ भाषेत मतप्रदर्शन करणे, एखाद्या धर्माच्या भावना
दुखावतील अशा पद्धतीने मेसेज पोस्ट करणे, राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फ करून बदनामीसाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्ट्राग्राम या सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमांवर प्रसिध्द केले जात असल्याच्या सायरबर गुन्ह्यात वाढ होत आहे. सामाजिक माध्यमावरील अशा उत्तर-प्रत्युत्तरामध्ये तरुणाई गुंतत आहे.

याचे भान ठेवा…

  • सामाजिक माध्यमांवरील लिखाण
  • बेजबाबदारपणे केल्यास करिअरवर परिणाम.
  • भविष्यातील तुमच्या चांगल्या संधी हिरावल्या जाऊ शकतात.
  • परदेशवारी करायची असेल, तर त्यालाही अडथळा येतो.
  • व्यक्त होण्यापूर्वी आपण करतोय ते योग्य आहे का? याची खातरजमा करा.
  • एखाद्या पोस्टमुळे वादंग होणार असेल अशा प्रकारे व्यक्त न झालेलेच योग्य राहील.
  • राजकीय चिखलफेकीमध्येही सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी न होणे केव्हाही चांगले. सभ्य भाषेचा वापर केला पाहिजे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news