अर्थसंकल्पातून मुंबईकरांची निराशा – संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत

पुढारी ऑनलाईन : मुंबईतून देशाला सर्वाधिक महसूल मिळतो, पण महाराष्ट्राला अर्थसंकल्पापूर्वी जो हलवा केला जातो, त्यातील चमचाभर हलवाही मुंबईला निधी नाही, असे म्हणत अर्थसंकल्पातून मुंबईकरांची निराशा झाल्याची खंत खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवली. दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, अमृतकाळ हा केवळ भाजपच्या निवडणुकांसाठी आहे. हा पूर्णपणे निवडणुकीचा अर्थसंकल्प आहे.पालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच मोदी सरकारने अर्थसंकल्पातील या घोषणा केल्या आहेत. जनतेच्या पैशाने सार्वत्रिक निवडणुका कशा लढवायच्या याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई, महाराष्ट्राचे औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या नुकसान करण्याचे कारस्थान सुरू आहे.पंतप्रधान सातत्याने मुंबईचे दौरे करीत आहेत,केंद्रीय मंत्र्यांच्या टोळधाडी येत आहेत,उपमुख्यमंत्री मोठमोठ्या घोषणा करीत आहेत. पंरतु, मुंबईला काय मिळणार हा एक रहस्याचा विषय आहे. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या घोषणा केल्या जात आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे. शिवसेनेची सत्ता घालवून,महापालिका जिंकून, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे समाधान जर कुणाला मिळवायचे असेल तर ते शक्य नाही, असेही राऊत म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले आहे. भाजपने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. प्रधानमंत्री येताना झोळी खाली करून येतात आणि जाताना भरून घेऊन जातात, अशी टीका देखील राऊत यांनी यावेळी केली. तसेच मुंबईला बजेटमधून काय मिळाले? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news