धुळे : पुढारी वृत्तसेवा
यमुनेच्या पाण्यात मुघलांच्या घोड्यांना संताजी-धनाजी दिसत होते. तसेच देशात कुठेही गेले तरी पंतप्रधान मोदींना ठाकरे-पवार दिसतात. पंतप्रधानांची आजची अवस्था खरोखरच चिंताजनक झाली आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना पवार-ठाकरेच दिसतात. त्यांची ही अगतिकता व अस्वस्थपणा दिसतो, अशी टीका आज माझी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र बाहेरील प्रचार सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. या टीकेला धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी खरमरीत शब्दात उत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रातील उमेदवार निवडून आणण्याकरीता सत्तावीस सभा घेवूनही पुरेशा वाटत नाहीत. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनता समजून आहे. महाराष्ट्र सोडून पंतप्रधान लोकसभेच्या प्रचारासाठी देशात जिथे जातात, तिथे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे व महाराष्ट्राचे वयोवृध्द नेते शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख झाल्याशिवाय भाषणच करता येत नाही. उध्दव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे. असे पंतप्रधान म्हणतात. महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे यापेक्षा मोठे दुर्देव म्हणजे, महाराष्ट्रातील भाजपाची आजची अवस्था खऱ्या अर्थाने केविलवाणी व दयनीय झाली आहे, अशी टीका गोटे यांनी केली आहे.
तुमच्याकडे राष्ट्रवादीचे घड्याळ व शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. चाळीस आमदार अर्थपूर्ण कार्यक्रम करून फोडले. तरी सुध्दा तुम्हाला विजयाची शक्यता वाटत नाही. ही तुमची भिती आहे की, उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल भरलेली धडकी आहे. हे महाराष्ट्राची जनता समजून चुकली आहे. असा दावा देखील गोटे यांनी केला.
तेलंगणा राज्यात लोकसभा निवडणूक प्रचाराच्या भाषणात पंतप्रधानांची हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, 'उध्दव ठाकरे हे नकली शिवसेनेचे अपत्य आहे. तर महाराष्ट्राचे वयोवृध्द नेते शरद पवार नेत्यांनी गेल्या ६० वर्षात काय केले? असा प्रश्न ज्या निवडणुकांशी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांचा दुरान्वये संबंध नाही. अशा ठिकाणी तुम्हाला त्यांचे नामस्मरण करावे लागते. यातच ठाकरे व पवार हे तुमच्या बरोबरीचे, तुल्यबळ नेते आहेत. हे तुम्हीच सिध्द करून दिले. देशपातळीवरील कुठलाही नेता कधीही राज्यातील छोट्या नेत्यांचा अनवधानाने अथवा उपरोधाने सुध्दा उल्लेख करीत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन काळात तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू हे अनेकदा महाराष्ट्रात आले. पण त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांचा नामोल्लेख कायमच टाळला. हे पंडीत जवाहरलाल नेहरूंचे मोठेपण आहे. पंतप्रधानांची आजची अवस्था खरोखरच चिंताजनक झाली आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना पवार-ठाकरेच दिसतात. त्यांची ही अगतिकता व अस्वस्थपणा मुघलांच्या काळात यमुना नदीवर पाणी पिण्यासाठी गेलेल्या मुघलांच्या घोड्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे. घोडे यमुनेच्या पाण्याला तोंड सुध्दा लावत नसत. पण येथे पंतप्रधान मोदींना स्वतःला पवार ठाकरे साहेबां शिवाय दिवसरात्र दुसर कोणीच दिसत नाही. यावरून महाराष्ट्रातील भाजपाची अवस्था किती दयनीय व केविलवाणी झाली. हे स्पष्ट झाले आहे. असा उपरोधिक टोला देखील गोटे यांनी लगावला आहे.
हेही वाचा: