सातगाव पठारावर दुष्काळी झळा; पिण्याच्या पाण्यासह चार्‍याचा प्रश्न गंभीर | पुढारी

सातगाव पठारावर दुष्काळी झळा; पिण्याच्या पाण्यासह चार्‍याचा प्रश्न गंभीर

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पाण्यासह चार्‍याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. चारा छावण्या झाल्या नाही, तर शेतकर्‍यांना बागायती भागातील नातेवाइकांकडे स्थलांतर करावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सातगाव पठार भागातील शेती ही प्रामुख्याने जिराईती असल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. पाण्याची टंचाई ही सातगाव पठार भागाला नेहमीच भासते.

यावर्षी त्या टंचाईची तीव्रता जास्त आहे. सध्या दिवसभराच्या अतिउष्णतेमुळे विहिरी, कुपनलिकांमधील जलस्रोत आटले आहेत. पेठ, कारेगाव, भावडी, कोल्हारवाडी, थुगाव, कुरवंडी, पारगाव तर्फे खेड या सर्व गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. पेठ गावाला पाणीपुरवठा केला जाणारा खेड घाटातील इंदिरा पाझर तलाव आटला आहे. तेथील विहिरीच्या पाण्याने तळ गाठल्याने पेठला पाणी पोहोचत नाही. त्यामुळे पेठ गावात घोडेगाव पंचायत समितीमार्फत रोज एका टँकरच्या माध्यमातून सरासरी तीन ते चार फेर्‍या करून ठाकर वस्ती, बेट वस्ती भागांमध्ये पाणी पुरवले जाते. हीच परिस्थिती कुरवंडीसह पठार भागातील सर्व गावांमध्ये दिसून येते.

पाणीटंचाईमुळे खासगी टँकर विकत घेऊन पाणी शुद्धीकरण करून ते विकावे लागते. त्यामुळे सध्या तरी ’ना नफा ना तोटा’ या तत्त्वावरच पाणी प्लांट चालवावा लागतो. यात्रा व लग्नाचा हंगाम तसेच वाढत्या तापमानामुळे पाण्याला मागणी वाढली आहे.

– विजय कंधारे, वाकेश्वर अ‍ॅक्वा, पेठ.

तीव्र उन्हाच्या झळा वन्यप्राण्यांना, पशुपक्ष्यांना बसत आहे. त्यामुळे अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करताना दिसून येतात. घराजवळ एखाद्या भांड्यात रोज पशुपक्षी, वन्यप्राणी यांच्यासाठी पाणी आणि थोडे खाद्य ठेवावे.

– डॉ. अरुण महाकाळ, पशुवैद्यकीय अधिकारी, मंचर.

उन्हामुळे शरीरातील तापमान वाढते. त्यामुळे उन्हामध्ये काम करणे टाळावे किंवा सकाळ, संध्याकाळ या सत्रामध्ये काम करावे. साधा आहार घ्यावा. तेलकट खाणे टाळावे. नारळ पाणी, लिंबू सरबत, उसाचा रस, निरा, ताक, कोकम सरबत किंवा पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचे सेवन करावे.

– डॉ. प्रशांत गाडे, डॉ. प्रीतम गाडे, मंचर. डॉ. तुषार पाटोळे, पेठ.

हिरव्या चार्‍याअभावी दुग्ध उत्पादन घटले

पाळीव प्राणी, जनावरांनासुद्धा पाणीटंचाईची झळ बसत आहे. पावसाळ्यामध्ये साठवून ठेवलेल्या कडबा आणि सुका चारा जनावरांना द्यावा लागत आहे. तीव्र उन्हामुळे दूध उत्पादनामध्ये घट झाली आहे. गाई, बैल, शेळ्या आदी प्राण्यांच्या शरीराचे तापमानसुद्धा वाढत आहे. त्यामुळे प्राण्यांमध्ये भूक न लागणे, धापा टाकणे, सामान्यपेक्षा अधिक हळू चालणे असे आजार दिसून येतात. यावर अनेक गोपालक यांनी जनावरांच्या गोठ्यांमध्ये विद्युत पंखे लावले आहेत. वाढत्या तापमानाचा मानवी शरीरावरसुद्धा विपरीत परिणाम होत आहे. पठार भागामध्ये ताप, उलटी जुलाब, उष्माघात, गोवर, गालफुगी, त्वचेवर नागिनीसारखा आजार याचे रुग्ण वाढलेले दिसून येतात.

हेही वाचा

 

Back to top button