धुळे : पुढारी वृत्तसेवा
राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या जागांच्या तसेच थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायतींच्या 61 सदस्य तर 2 थेट सरपंच पदांचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पोटनिवडणुकांमध्ये राखीव जागेकरीता नामनिर्देशनपत्रासोबत जातीचा दाखला व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. तसेच या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषण मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही, असेही नमूद केले आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन) यांनी कळविले आहे.
तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक – मंगळवार, 18 एप्रिल, 2023. नामनिर्देशन पत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – मंगळवाj, 25 एप्रिल ते मंगळवार, 2 मे, 2023. वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 (शनिवार 29 एप्रिल, रविवार 30 एप्रिल, सोमवार 1 मे 2023 रोजीची सार्वजनिक सुटी वगळून). नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ – सोमवार 3 मे, 2023 वेळ सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ- सोमवार, 8 मे, 2023 दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ- सोमवार, 8 मे, 2023, दुपारी तीन वाजेनंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- गुरुवार, 18 मे, 2023, सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (नक्षलग्रस्त भागामध्ये सकाळी 7.30 वाजेपासून ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत), मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील)- शुक्रवार, 19 मे, 2023, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक – बुधवार, 24 मे, 2023 राहील. असेही उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी कळविले आहे.
हेही वाचा :