कार पुलावरून कोसळल्याने दोघे जखमी | पुढारी

कार पुलावरून कोसळल्याने दोघे जखमी

मंचर : मंचर-घोडेगाव रस्त्यावरील नारोडी फाटा येथे अचानक समोरून आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात कारमधील दोघे जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी घडली. चास (ता. आंबेगाव) येथील सेवानिवृत्त सैनिक सुरेश बापू भोर (वय 62) हे गणेश गोविंद बारवे यांच्यासमवेत कारने (एमएच 14 जेएमओ 419) मंचर बाजूकडून घोडेगाव येथे कामानिमित्त जात होते.

त्या वेळी नारोडी फाटा येथे पुलाजवळ रस्त्यावर एक डंपर उभा होता तसेच रस्त्यावर काही ठिकाणी मुरमाचे ढीग टाकले होते. डंपरच्या पुढील बाजूने अचानक एक दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार पुलावरून कोसळली. यात भोर व बारवे हे जखमी झाले. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.

…अन् मुरमाचे ढीग झाले सपाट
नारोडी फाटा पुलाजवळ कामासाठी काही मुरमाचे ढीग टाकण्यात आले होते. मात्र, अपघात झाल्यानंतर ठेकेदाराने काही वेळातच जेसीबी आणून मुरमाचे ढीग सपाट केले. मुरमाचे ढीग रस्त्याच्या बाजूला टाकल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ढीग नसते तर अपघात टळला असता.

Back to top button