धुळे : विवाहितेची गळा चिरून हत्या करणाऱ्या युवकाला जन्मठेपेची शिक्षा

file photo
file photo
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा

विवाहितेला लॉजवर बोलवून तिचा गळा चिरून हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायाधीश ए एच सय्यद यांनी सुनावली आहे. घटना घडण्यापूर्वी मयत आणि आरोपी यांना प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार फितूर झालेला असताना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी मोबाईलचे विश्लेषण हा महत्त्वाचा पुरावा न्यायालयात सिद्ध केला. या तांत्रिक पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. खून करण्यापूर्वी आरोपीने मयतासोबत काढलेला सेल्फी आणि खून केल्यानंतर मृतदेहाचा काढलेला फोटो हा पुरावा या खटल्यामध्ये पुराव्यांमधे महत्त्वपूर्ण मुद्दा ठरला आहे

शिरपूर येथील वडगल्ली मध्ये राहणाऱ्या रेणुका धनगर यांचा विवाह दि. 23 मार्च 2019 रोजी झाला. दुसऱ्या दिवशी त्या त्यांच्या माहेरी जातोडा येथे आल्यानंतर दि. 25 मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास घरून गावातच चहा पिण्यासाठी कारण सांगून रेणुका घरातून बाहेर पडली. मात्र जाताना तिचा मोबाईल घरीच विसरली. या दरम्यान रेणुका ही नरेंद्र एकनाथ भदाणे यांच्या समवेत दुचाकीने शिरपूर येथील संगीता लॉज येथे आली. या लॉजमध्ये तिचा नरेंद्र भदाणे यांनी धारदार चाकूने गळा चिरून खून केला. यावेळी मयत रेणुकाच्या भ्रमणध्वनीवर त्याने संपर्क करून तिच्या आईला स्वत:चे नाव सांगून रेणुकाचा खून केल्याची माहिती देखील दिली. त्यामुळे विवाहीतेचे नातेवाईक तत्काळ संगीता लॉज येथे पोहोचले. यावेळी खोली नंबर 109 मध्ये रेणुका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. त्यामुळे शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास केला.

मोबाईल मधील सेल्फी आणि लास्ट सीन टुगेदरचा पुरावा

तपासात प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार केल्याबाई पावरा, लॉजचा मालक पवन शिंदे, लॉज शेजारी असणाऱ्या मेकॅनिकल महेंद्र गिरासे यांच्या साक्ष घेण्याची यादी न्यायालयाला दिली. त्याचप्रमाणे आरोपी नरेंद्र उर्फ पप्पू शेटे याचा मोबाईल जप्त केला होता. या मोबाईलची तपासणी केली असता त्यात या आरोपीने मयतासोबत खून करण्यापूर्वी सेल्फी फोटो काढला. खून केल्यानंतर देखील त्याने रेणुकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेहाचा फोटो काढण्याची बाब निदर्शनास आली. तपासा दरम्यान हा मोबाईल तज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. तसेच आरोपीचा रक्ताने भरलेल्या शर्ट देखील जप्त करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले. आरोप निश्चितीनंतर या खटल्याची सुनावणी धुळे येथील सत्र न्यायाधीश ए एच सय्यद यांच्या न्यायालयात सुरू झाली. हा खटला लास्ट सीन टुगेदर या संज्ञेवर म्हणजेच खून होण्यापूर्वी मयत आणि आरोपी यांना एकत्रितपणे पाहणाऱ्या साक्षीदारावर अवलंबून होता.

युक्तिवादामध्ये मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण

साक्षीदारांच्या साक्षीनुसार आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे दाखले न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. युक्तिवादादरम्यान त्यांनी प्रत्येक घटनेला प्रत्यक्षदर्शी मनुष्य साक्षीदार हवा असे नाही. बऱ्याच वेळेस तांत्रिक पुराव्याने सुद्धा लास्ट सीन टुगेदर हे सिद्ध होऊ शकते. विज्ञानाचे युगामुळे ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मोबाईल मध्ये सुद्धा कॅमेरे उपलब्ध आहे. मोबाईलचा हा पुरावा सायलेंट विटनेस या संज्ञेखाली येतो. व मनुष्य खोटे बोलू शकतो परंतु फोटोमध्ये जे आहे तेच दिसते. सेल्फी मध्ये घेतलेला फोटो मधील शर्ट व मयताच्या रक्ताचे डाग असलेल्या आरोपीचा शर्ट हा न्यायालयासमोर असून दोन्ही सारखेच आहेत. तसेच आरोपीच्या अंगावर कुठलीही जखम नसताना त्याच्या शर्टावर मयताच्या रक्तगटाचे डाग आल्याचे रिपोर्ट देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. जरी खटल्याचे महत्त्वपूर्ण साक्षीदार मयत व फितूर झाले. तरीसुद्धा मोबाईल मधील सेल्फी आणि मयताच्या रक्ताच्या थारोळ्यातील फोटो हे मयत आणि आरोपी हे घटना होण्यापूर्वी एकत्र होते. व फोटोने सुद्धा लास्ट सीन थिअरी सिद्ध होते .फोटो हा सायलेंट विटनेस असून हे सर्व प्रमाण ॲड तंवर यांनी सिद्ध झाले असल्याचे आपल्या युक्तिवादात स्पष्ट केले. हा प्रभावी युक्तिवाद व सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे दाखले ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने आरोपी नरेंद्र एकनाथ भदाणे उर्फ पप्पू शेटे याला जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंडाची रक्कम भरण्याचा आदेश केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या ,ॲड सोनवणे ,ॲड भोईटे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ॲड मयूर बैसाणे, ॲड प्रेम सोनार, कॉन्स्टेबल संदीप पाटील यांचे देखील सहकार्य लाभले आहे .

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news