पुणे: मुलीने साद घातली अन् पित्याचे डोळे पाणावले, जन्मानंतर सहा वर्षांनी बाप-लेकीची भेट | पुढारी

पुणे: मुलीने साद घातली अन् पित्याचे डोळे पाणावले, जन्मानंतर सहा वर्षांनी बाप-लेकीची भेट

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कौटुंबिक वादातून लग्नाच्या काही महिन्यांनंतर ते एकमेकांपासून विभक्त राहू लागले. यादरम्यान, पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सहा वर्षांपासून मुलीला एकदाही न भेटलेल्या तसेच पत्नीपासून विभक्त राहणार्‍या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र, ती नांदायला जायला तयार होती. अखेर वकिलांनी समुपदेशनादरम्यान दोघांनाही चिमुकलीचा विचार करण्याचा सल्ला दिला. समुपदेशनानंतर दोघांनी एकत्र येण्याचे ठरविल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या चिमुकलीने पप्पा म्हणत वडिलांच्या दिशेने धाव घेतली. सहा वर्षांनंतर प्रेमळ हाक ऐकल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी बापाने लेकीला कुशीत घेतले.

रंजन (वय 36) आणि रंजना (वय 32) (नावे बदललेली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही उच्चशिक्षित आहेत. तो तामिळनाडू येथील आहे, तर ती पुण्यात राहते. 2015 मध्ये दोघांचा पारंपरिक पध्दतीने विवाह झाला. काही दिवस संसार सुरळीत केल्यानंतर किरकोळ कारणावरून दोघांत वाद झाले. त्यानंतर तो मूळगावी तामिळनाडू येथे निघून गेला, तर गरोदर असलेली ती माहेरी गेली. 2016 पासून दोघे विभक्त राहू लागले. तिला 2017 मध्ये मुलगी झाली. त्याने तामिळनाडू येथे घटस्फोटाचा दावा दाखल केला. तिने नांदायला तयार असल्याची केस पुणे येथील न्यायालयात केली. स्वत: व जन्मलेल्या मुलीसाठी पोटगी मागितली.

यादरम्यान, तिने सर्वोच्च न्यायालयात दाद मागून तामिळनाडू येथील केस पुण्यात ट्रान्सफर करून घेतली. तो हजर झाला. त्याचे समुपदेशन करण्यात आले. मात्र, त्याला यश आले नाही. घटस्फोटासाठी तिला चेन्नई येथील सदनिका आणि दागिने मिळून 1 कोटी रुपयांची संपत्ती देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ती नांदण्यावरच ठाम होती. दोघांना त्यांच्या वकिलांनी समजावून सांगितले. ते दोघे एकत्र राहण्यास तयार झाले. त्यांनी नव्याने संसार सुरू केला. त्यानंतर एकामेकांच्या विरोधातील केसेस काढून टाकल्या. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी. बी. येरलेकर यांच्या न्यायालयात या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

समुपदेशन हे मानवासाठी वरदान आहे. समुपदेशनामुळे सात वर्षांपासून वेगळे राहणारे पती-पत्नी एकत्र आले आहेत. दोघांनी नव्या जोमाने पुन्हा संसार सुरू केला आहे. मुलीचे भविष्यही सुखकर बनणार आहे.

– अ‍ॅड. राणी कांबळे-सोनावणे, पतीच्या वकील

Back to top button