Balu Dhanorkar | बाळू धानोरकर यांच्या रूपाने चंद्रपुरातील तृतीयपंथीयांचा आधारवड हरपला | पुढारी

Balu Dhanorkar | बाळू धानोरकर यांच्या रूपाने चंद्रपुरातील तृतीयपंथीयांचा आधारवड हरपला

Balu Dhanorkar - तृतीयपंथीयांच्या घरासाठी घेतले होते परिश्रम

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे आज (दि.३०) पहाटे दिल्लीतील मेदांता हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनावर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर तृथीयपंथीयांनीही आमचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. (Balu Dhanorkar)

राज्यात तृथीयपंथीयांना हक्काचे घर व्हावे, याकरीता खासदार बाळू धानोकर यांनी पुढाकार घेतला होता. चंद्रपुरातील रय्यतवारी वार्डात तृतीयपंथांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधींच्या निधीतून नव्हे, तर स्वत:च्या खिशातून पैसे खर्च केले होते. काही महिन्यापूर्वीच रय्यतवारी वार्डात एका निवाऱ्याचे भूमीपूजनही खासदार धानोरकर यांच्याच हस्ते पार पडले होते. समाजात वंचित असलेल्या तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे पाऊल धानोरकर दाम्पत्यांनी उचलले होते. (Balu Dhanorkar)

खासदार धानोरकर यांच्या या उपक्रमाची चर्चा चंद्रपुरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात झाली. खासदार धानोरकर यांनी तृतीयपंथीय समाजाला मानसन्मान देण्याची सुरूवात स्वत:च्या घरापासून सुरू केली होती. भाऊबीज असो वा दिवाळी. या दोन्ही सणाला त्यांना घरी पुजेचा मान दिला जात होता. हाच मानसन्मान समाजात त्यांना मिळवून द्यायचा होता. परंतु नियतीला मान्य नव्हते. ज्या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली त्याला पूर्ण करण्याची वेळ मात्र मिळाली नाही. आपल्यातून एक भाऊ आणि प्रेमाचा माणूस गेल्याचे दु:ख पचविणे तृतीयपंथीयांना अवघड जाणार आहे.

हेही वाचा 

Back to top button