मुंबईत ‘डब्बा ट्रेडिंग’ रॅकेट उद्ध्वस्त

मुंबईत ‘डब्बा ट्रेडिंग’ रॅकेट उद्ध्वस्त

ठाणे : संतोष बिचकुले; विक्रोळी परिसरात 'डब्बा ट्रेडिंग'च्या नावाखाली चालणार्‍या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. त्यात 1 कोटी 1 लाखांचा कर चुकवणार्‍या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.या गैरव्यवहाराची व्याप्‍ती मोठी आहे. दीड वर्षात 'डब्बा ट्रेडिंग'मध्ये 8 हजार 574 कोटींची गुंतवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार, दलाल आणि हवाला चालवणारे मोठे रॅकेट पोलिसांच्या 'रडार'वर आहे. आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी-हिरानंदानी परिसरातील कैलास बिझनेस पार्कमध्ये लॅपटॉप, मोबाईलच्या माध्यमातून गुंतवणूक होत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) व बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) यांच्या अधिकार्‍यांसह बिझनेस पार्कमध्ये छापा टाकला. या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप व अन्य साहित्य जप्‍त करण्यात आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आणि पार्क साईट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा मुंबई आर्थिक गुन्हे नियंत्रण कक्षाकडे वर्ग केला.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली नोंदवही, 5 लॅपटॉप, 45 मोबाईल, नोटा मोजण्याची मशिन, 5 लाख 90 हजार रुपयांची रोकड जप्‍त करण्यात आली आहे. तपासादरम्यान या आरोपींनी 8 हजार 547 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याचे निष्पन्‍न झाले आहे.

काय आहे 'डब्बा ट्रेडिंग'?

'डब्बा ट्रेडिंग'मध्ये शेअर्स आणि कमोडिटीज्चीही खरेदी-विक्री केली जाते, या ठिकाणी फक्‍त त्याच्या क्लायंटने केलेल्या व्यवहारांची नोंद त्याच्या रजिस्टरमध्ये करतो, त्यापलीकडे हे सौदे एक्स्चेंज किंवा मार्केटपर्यंत पोहोचत नाहीत. यात मोठा नफा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले जाते. या नफ्यावर ना कर लागतो आणि ना त्याला केवायसीची आवश्यकता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा पैसा या 'डब्बा ट्रेडिंग'मध्ये गुंतवण्यात आला आहे.

अशी करायचे शासनाची फसवणूक

हवालामार्फत पैसे घेऊन ते 'डब्बा ट्रेडिंग'च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवले जात होते. या रॅकेटमधील दलालांचे आधीपासून शेअर्स गुंतवलेले होते. त्या शेअर्सद्वारे काळा पैसा गुंतवणार्‍यांच्या पदरी नफा-तोटा पडत होता. विना डिमॅट अकाऊंटद्वारे लाखो रुपये गुंतवले जाऊन शासनाचा कर चुकवला जात होता.

हेही पाहा; रोजगार नोंदणी कार्डाची का आवश्यकता? या विषयावर मार्गदर्शन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news