कोल्हापूर जिल्हा बॅँक : जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी निवडणूक | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बॅँक : जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी निवडणूक

कोल्हापूर ; विकास कांबळे : सुरुवातीला एकतर्फी वाटणार्‍या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (District Bank Election) मतदानाचा दिवस जवळ येईल तसा रंग भरू लागला. अंतिम टप्प्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपाने आणि प्रचार यंत्रणेने घेतलेल्या गतीमुळे या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणार असल्याने ग्रामीण भागात सध्या केवळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे.

जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून बिनविरोधची चर्चा सुरू होती. माघारीपर्यंत त्याद‍ृष्टीने वाटचालही सुरू होती. शिवसेनेला गृहित धरूनच ही वाटचाल सुरू होती. परंतु, शेवटच्या क्षणी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला एक जादा जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे स्वाभिमान दुखावलेल्या शिवसेनेने शड्डू ठोकला आणि येतील त्यांना सोबत घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (District Bank Election) मतदानाचा दिवस केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीच्या प्रचार यंत्रणेने गती घेतली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा होती. परंतु, नऊ गटांतील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचे ते कायम सांगत होते. आणि तसेच झाले. तालुक्यातील विकास संस्था गटातून दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. त्यांच्यासह भाजप उमेदवाराची निवडदेखील बिनविरोध झाली.

शिवसेनेमुळे निवडणूक लागली, असे सत्तारूढकडून आरोप करण्यात येत असला, तरी ते पूर्ण सत्य नाही. कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया गटातील संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची उमेदवारी हा कळीचा मुद्दा होता. आसुर्लेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. परंतु, त्यांना जनसुराज्य शक्‍तीचे आ. विनय कोरे यांचा टोकाचा विरोध आहे.

त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये, असा आग्रह त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे धरला. आ. कोरे सध्या भाजपसोबत आहेत. मंत्री मुश्रीफ व आ. कोरे यांचा दोस्ताना संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे, तरीदेखील मंत्री मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसच्या तगड्या उमेदवाराला नाकारतील, असे वाटत नव्हते. परंतु, आ. कोरेंच्या आग्रहास्तव आसुर्लेकर यांना मंत्री मुश्रीफ यांनी आघाडीतून डच्चू दिला. या संपूर्ण चर्चेत शिवसेनेचे खा. संजय मंडलिक होते. त्यांनी आसुर्लेकर यांच्यासाठी आग्रह धरला.

कारण, खा. मंडलिक व आसुर्लेकर हे गेल्या वेळी एकाच गटातून निवडून आले आहेत. आता देखील एकाच गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या गटातील निवडणुकीचे राजकारण त्यांना चांगलेच माहीत आहे. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आसुर्लेकरांना केलेला विरोध आणि शिवसेनेला एक जादा जागाही देण्यास दिलेला नकार यामुळे खा. मंडलिक यांनी शेवटच्या क्षणी शिवसेनेचे पॅनेल जाहीर केले. दोन्ही पॅनेल जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग आला. मेळाव्यांमधून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चुरस वाढू लागली.

शाहूवाडीकडे सर्वांचे लक्ष

शाहूवाडी तालुका विकास संस्था गटात जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे सर्जेराव पाटील – पेरीडकर विरुद्ध रणवीर गायकवाड यांच्यात लढत आहे. गेल्या निवडणुकीत पेरीडकर यांनी मानसिंग गायकवाड यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मानसिंग यांनी मुलाला रिंगणात उतरविले आहे. त्यांनी गेल्या वर्षभरापासून बँकेच्या निवडणुकीची तयारी केली आहे.

गडहिंग्लजला विद्यमान आमने-सामने

गडहिंग्लज तालुका विकास संस्था गटातून संतोष पाटील व विनायक ऊर्फ आप्पी पाटील या दोन विद्यमान संचालकांमध्ये लढत रंगली आहे. दोघांच्याही प्रतिष्ठेची ही लढत असल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

भुदरगडमध्ये वर्चस्वासाठी लढत

भुदरगड तालुक्यातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेतेमंडळी गुंतली होती. परंतु, शिवसेनेचे दुसरे पॅनेल झाल्यामुळे त्यांना यश आले नाही. आ. के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजित विरुद्ध यशवंत नांदेकर अशी लढत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा के. पी. व आ. प्रकाश आबिटकर गट आमनेसामने आले आहेत.

आजर्‍यात चुरस

आजरा तालुका विकास संस्था गटातून विद्यमान संचालक अशोक चराटी व सुधीर देसाई यांच्यात चुरस आहे. प्रत्येक मतदाराला सोबत घेण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे.

पन्हाळा बिनविरोध करण्यात अपयश

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे आ. विनय कोरे यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपली जागा बिनविरोध करता आली नाही. या निवडणुकीत त्यांच्या विरोधात विजयसिंह पाटील रिंगणात आहेत.

इतर शेती संस्था सभासद गट

या गटात विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे भैया माने व शेकापचे नेते संपतराव पवार-पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह यांच्यात थेट लढत आहेत.

महिलांमधील लढत रंगतदार

महिला गटामध्ये शिवसेनेच्या निवेदिता माने सत्तारूढ आघाडीतून पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत. विद्यमान संचालिका उदयानीदेवी साळोखे यांना डावलून श्रृतिका काटकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना आघाडीतून रेखा कुराडे व पी. जी. शिंदे यांच्या पत्नी लतिका शिंदे लढत देत आहेत. पी. जी. शिंदे संचालक असल्यामुळे त्यांना या निवडणुकीचा चांगला अनुभव आहे.
आमदार विरुद्ध कार्यकर्ता

अनुसूचित जाती, जमाती गटात आमदार विरुद्ध चळवळीतील कार्यकर्ता अशी लढत आहे. या गटात काँग्रेसचे आ. राजू आवळे व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यात लढत आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्याला प्रथमच संधी मिळाल्यामुळे आरपीआयच्या बहुतांश गटांचे कार्यकर्ते आपापल्या परीने मदत करत आहेत.

माजी सभापती विरुद्ध माजी ‘गोकुळ’ संचालक

विमुक्‍त जाती, विशेष मागास प्रवर्ग गटात ‘गोकुळ’चे माजी संचालक विश्‍वास जाधव व करवीर पंचायत समितीच्या सभापती स्मिता गवळी यांच्यात लढत होत आहे. गवळी सत्तारूढ आघाडीतून, तर जाधव शिवसेनाप्रणीत आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत.

इतर मागासवर्गीय गट

इतर मागासवर्गीय गटातून सत्तारूढ आघाडीतील काही विद्यमान संचालक निवडणुकीसाठी इच्छुक होते. परंतु, सत्तारूढ आघाडीकडून जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे विजयसिंह माने यांना उमेदवारी मिळाली. शिवसेना आघाडीकडून करवीर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडके यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. मडके काँग्रेसकडून सभापती झाले होते. परंतु, आता ते शिवसेनेमध्ये आहेत.

निवडणूक लावणारा गट

कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया गटातील उमेदवारीवरूनच दोन्ही काँग्रेस व शिवसेनेचे बिनसल्यामुळे शिवसेनेने आपले पॅनेल जाहीर केले. या गटातून खा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे शिवसेनाप्रणीत आघाडीतून निवडणूक लढवत आहेत. सत्तारूढ आघाडीने प्रदीप पाटील-भुयेकर व मदन कारंडे यांना उमेदवारी दिली आहे. या गटात दोन विद्यमान संचालकांचे सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान आहे.

शिरोळमध्ये काटाजोड लढत (District Bank Election)

तालुका विकास संस्था गटात शिरोळ तालुक्यातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या गटात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विरुद्ध गणपतराव पाटील यांच्यात काटाजोड लढत आहे. या ठिकाणी मंत्री यड्रावकर यांना घेरण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत.

Back to top button