पुढारी ऑनलाईन: काल (दि.०४) च्या तुलनेत आज सोमवारी (दि.०१ मे) देशभरातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा किंचितशी घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ४ हजार २८२ नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशभरात २५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे केरळमध्ये झाले आहेत. या तुलनेत काल देशात ५ हजार ८७४ नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
गेल्या २४ तासात देशभरात ६, ०३७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर देशभरातील पॉझिटीव्ह कोरोना रूग्णांची संख्या ४९,०१५ इतकी आहे. देशातील दैनंदिन कोरोना पॉझिटीव्हीटी सरासरी दर ३.३१ इतका आहे, तर आठवड्याचा हाच दर ४.२४ टक्के इतकी आहे. आत्तापर्यंत देशभरात कोरोना संक्रमण झालेल्या रूग्णांची संख्या ४,४९,४५,३८९ (४.४९ कोटी) इतकी नोंदवण्यात आली आहे.
कोरोनातून आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ४,४३,६४,८४१ वर गेली आहे. तर मृत्यूचे प्रमाण १.१८ टक्के नोंदवण्यात आले आहे. देशव्यापी COVID-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे २२०.६६ कोटी डोस देण्यात आले आहेत. असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीत सांगितले आहे.