अहमदनगर जिल्ह्यातील 18 हजार युवकांनी दिली ‘एमपीएससी’ परीक्षा | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यातील 18 हजार युवकांनी दिली ‘एमपीएससी’ परीक्षा

नगर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी घेण्यात आली. 18 हजार 180 पदवीधर युवकांनी ही परीक्षा दिली. परीक्षेसाठी बाहेरगावाहून आलेल्या परीक्षार्थीमुळे रिक्षाचालकांची चांदी झाली. एसटी महामंडळाला देखील उत्पन्न मिळाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अहमदनगर केंद्रावरील 77 उपकेंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षार्थींची संख्या अधिक असल्यामुळे अहमदनगर शहराबाहेरील पारनेर तालुक्यात पाच तर राहुरी तालुक्यात एका उपकेंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. अहमदनगर शहराबाहेर काही उपकेंद्रे असल्यामुळे परीक्षार्थीची तारांबळ उडाली. या परीक्षेसाठी 23 हजार 287 परीक्षार्थीची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या परीक्षेकडे 5 हजार 113 परीक्षार्थींनी पाठ फिरवली.

या परीक्षेसाठी 2 हजार 557 अधिकारी व कर्मचार्‍यांचा स्टाफ नियुक्त करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरातील सर्व एसटीडी बूथ, फॅक्स, झेरॉक्स, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडल्याचे केद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी सांगितले. बाहेरगावांहून परीक्षेसाठी आलेल्या युवकांना परीक्षा केंद्र सापडणे अवघड झाले होते. त्यामुळे अनेकांनी रिक्षांचा आसरा घेतला. त्यामुळे रिक्षाचालकांची चंगळ झाली. परंतु काही रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात भाडे वसूल केले.

Back to top button